एकदा पुन्हा शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आधी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला की, त्या भागात मनपाच्या वतीने फवारणी केली जात होती. मात्र, आता तसे काही दिसून येत नाही. त्यामुळे फवारणी होत नाही का हो? अशी चर्चा आता ज्येष्ठांच्या कट्ट्यांवर रंगू लागली आहे.
दररोज हजारांच्यावर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. दुसरीकडे ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णालयांमध्ये बेडसुद्धा कमी पडू लागले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंधसुद्धा घालण्यात आले आहेत. पण, मनपाकडून आधीप्रमाणे कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याची चर्चा आहे. प्रतिबंधित क्षेत्राचे फलक लावण्यास सुरुवात झाली आहे. फवारणीसुद्धा केली जाणार होती. परंतु, तसे कुठे बघायला मिळाले नाही. मागील वर्षी प्रत्येक कार्यालय, गल्ली-बोळ भागांमध्ये फवारणी केली जात होती. मात्र, आता तसे दिसून येत नसल्यामुळे उपाययोजना फक्त कागदावरच आहे का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.