(सुशील देवकर)
खराब वस्तूच मिळते स्वस्तात...
हल्ली माल खपवायचा असला की विक्रेत्यांकडून सेलची घोषणा करीत किमतीत सूट दिल्याचे सांगत माल खपविला जातो. मात्र अनेकदा असे लक्षात येते की मूळ किंमत वाढवून त्यावर सूट दिली आहे किंवा कमी किंमत लावलेला माल हा खराब आहे. मात्र तरीही केवळ डिस्काउंट किंवा स्वस्तात मस्त या घोषणेला ग्राहक भुलतात. असाच प्रकार शहरातील एका वर्दळीच्या रस्त्यावर घडला. एक विक्रेता चारचाकी वाहन घेऊन गजबजलेल्या या रस्त्यावरील एका चौकात चादरी (बेडशीट) विक्रीसाठी थांबला. ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी गाडीवरच लाउडस्पीकरवर देशभक्तीपर गाणे जोरात सुरू होते. मध्येच त्यावरूनच ५०० रुपयात ४ बेडशिटची घोषणाही होत होती. साहजिकच ग्राहकांची गर्दी वाढली. अनेकांनी घाईगर्दीत खरेदीही केली. मात्र काही चौकस लोकांनी एवढ्या स्वस्त हा माल कसा मिळतोय? काही खराबी तर नाही ना? म्हणून या बेडशिटची बारकाईने पाहणी केली. तेव्हा प्रत्येकच बेडशिटमध्ये काही ना काही डिफेक्ट असल्याचे आढळून आले. तेव्हा मात्र खराब वस्तूच स्वस्तात मिळते, असे म्हणत या ग्राहकांनी काढता पाय घेतला.