एरवी नागरिकांवर कारवाईचे दंडुके चालवून दंडाचा फटका सर्वसामान्यांना देणारे सत्तेच्या अधीन असलेले प्रशासन हे मात्र राजकीय नेत्यांच्या बंदोबस्ताच्या दिमतीला जाऊन गप्प बसले असल्याने तिसरी लाट येत आहे. ही लाट नागरिकांच्या बेफिकिरीमुळे नव्हे तर राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमामुळेच येईल हे स्पष्ट झाले आहे. अमळनेरात नुकत्याच रात्री बारा वाजता झालेल्या काँग्रेसच्या सभेवर प्रशासन नियंत्रण मिळवू शकले नाही. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर आमदार व्यासपीठावर येताच अनेक वर्षांपासून आपल्या नेत्यांच्या सत्कारासाठी उत्सुक असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. तरुणाईने तर मास्कदेखील बाजूला काढलेले दिसून आले. कोरोनाच्या काळात लोकांच्या सहभागातून सेवा करून जनतेला उपदेश देणारे आणि कोरोना बाधित होऊन बरे झालेलेदेखील गर्दीत विलीन झाले होते. काँग्रेसच्या सभेत राज्यातील विविध ठिकाणाहून आलेले नेते व जिल्हाभरातून आलेले कार्यकर्ते यामुळे कोणाला कोणाचा संसर्ग होणार हे सांगता येणार नाही.
- संजय पाटील, अमळनेर