राजेंद्र भारंबेसावदा, ता.रावेर : राज्यासह संपूर्ण देशात केळीची पंढरी म्हणून ओळख असलेले सावदा शहर तब्बल ११ महिन्यांनंतर केळी उत्पादक शेतकरी केळी व्यापारी केळी कामगार मजूर यांनी पुन्हा गजबजू लागले आहे. ६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर म्हणून सात वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दिल्लीला रेल्वेद्वारे केळी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात संपूर्ण केळी उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना व कामगारांना फायदा होत आहे. मागील वर्षी सुरूवातीपासूनच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन केला आहे. सोन्यासारखा शेतमाल मातीमोल भावात विक्री करावा लागला होता.शेतकऱ्यांची मरगळ झटकण्यासाठी व आपला शेतमाल इच्छित स्थळी पोचवण्यासाठी शासनाकडून किसान एक्सप्रेसद्वारे सावदा रेल्वे स्टेशन येथून आठवड्यातुन दोन वेळा व्हीपीयू व एकदा बीसीएन वॅगनद्वारे साधारण १५ हजार क्विंटल केळी दिल्ली येथील आजादपूर मंडीला रवाना करण्यात येत आहे म्हणूनच कासव गतीने होणारी केळी भाववाढ अचानक मुसंडी मारत हजाराच्या पार पोहोचली आहे. यात स्थिरता राहील, असे जाणकारांचे मत आहे.सात वर्षापासून ओस पडलेल्या सावदा रेल्वे स्टेशनला केळीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स, लोकल ट्रक, कामगार व मजुरांमुळे गतवैभव प्राप्त झाले आहे. सावदा स्टेशन येथे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर, यावल, रावेर, जामनेर, चोपडा, भडगाव, जळगाव या भागातूनदेखील केळी येत असल्याने केळीची पंढरी फुलली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण असले तरी काही भागात बाजारभावापेक्षा कमी भावाने केळी खरेदी होत असल्याने केळी उत्पादक हवालदिल होत आहे.रेल्वेकडून केळी वाहतुकीसाठी ५० टक्के अनुदानदेशाच्या एका कोपऱ्यातून दुसर्या कोपऱ्यापर्यंत शेतमाल जलद वाहतुकीद्वारे लवकर पोहचून शेतकरी आणि ग्राहक दोघांना फायदा होईल म्हणून किसान रेल्वेद्वारे शेतमालाची वाहतूक करण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालय व अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन -टॉप ते टोटल अंतर्गत भारतीय रेल्वेकडून रेल्वे सेवा प्रकाराच्या माध्यमातून ५० टक्के अनुदान केळी व अन्य फळांना उपलब्ध करुन दिले आहे. म्हणून ट्रकपेक्षा रेल्वेचे भाडे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना सोयीचे होत आहे६००ते ७०० जणांना मिळाला रोजगाररेल्वेने केळी वॅगन्स भरण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासत असते. एका डब्यासाठी १५ कामगार लागतात. एक दिवसाआड ४९ डबे सावदा रेल्वे स्टेशन येथून लोड होत असतात. त्यामुळे सावद्याला नव्याने ६०० ते ७०० लोकांना व ट्रक ड्रायव्हर, क्लीनर, ट्रॅक्टर ड्रायव्हर यांनादेखील रोजगार उपलब्ध झाला आहे भाड्याच्या तफावतीमुळे वाढले केळीचे बाजारभावरेल्वे एका क्विंटलसाठी १४० रुपये दर आकारणी करत असते. मात्र याउलट डिझेल व पेट्रोलच्या किमती वाढल्याने दिल्लीचे आजचे ट्रक भाडे ४५० रुपये प्रति क्विंटल आहे. ६ जानेवारी ते आजपर्यंत रेल्वेने ८० हजार क्विंटल केळी दिल्लीला पोहोचवली आहे. यातून रेल्वेला एक कोटी १२ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे तर हेच भाडे ट्रकने करायचे झाल्यास तीन कोटी ६० लाख रुपये एवढे असून, दोन कोटी ४४ लाखांची बचत झाली आहे. याचा सरळ फायदा केळीच्या बाजारभाव वाढीसाठी झाला आहे. रेल्वे नेकेडची वाहतूक नियमित राहिल्यास याचा सरळ फायदा शेतकरी व ग्राहकांनादेखील होणार आहे.जिल्ह्यातील आर्थिक जीवनरेखा असलेल्या केळीला रेल्वे वाहतुकीमुळे सुगीचे दिवस आले आहेत. रेल्वेने दिल्लीपर्यंत होणारी केळी वाहतूक उत्तर भारतातील जम्मू, पंजाब, कानपूर, लखनोसह इतर राज्यात रेल्वेने वाहतूक झाल्यास केळी शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळू शकतील.-कमलाकर रमेश पाटील, केळी उत्पादक शेतकरी, कोचूर, ता.रावेर
केळीचे पंजे करून बॉक्स भरणे व डोक्यावर केळीचे घड वाहतूक करणे मोठ्या जिकिरीचे काम असल्याने तरुणांनाच रोजगार उपलब्ध होता, पण रेल्वेने केळी वाहतूक सुरू झाल्याने वयस्कर व्यक्तीदेखील हे काम करीत आहे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असून हे स्वागतार्ह आहे.- पंकज पाटील, सचिव, केळी कामगार कल्याणकारी संघ, रावेर