राज्यभर गाजत असलेल्या बीएचआर या मल्टिस्टेट पतसंस्थेच्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास सुरुवातीला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडेच होता. त्यानंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. आताही पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. त्याशिवाय जिल्ह्यात कर्ज देणाऱ्या संस्थांमध्येही घोटाळे झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले. पतसंस्थांमध्येच मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असून, या संस्थांत राजकीय व्यक्तीच चेअरमन, संस्थापक, व्हाइस चेअरमन पदांवर आहे. सर्वाधिक संस्था या भुसावळातीलच असून, त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. बीएचआरमधील अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर अजूनही मोकाटच आहेत.
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या व्यवस्थापक, लेखापाल व बँक अधिकाऱ्यांनी मिळून साडेसहा कोटी रुपयांची रक्कम काढून अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आली असून, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. यात आतापर्यंत सात जणांना अटक झालेली असली तरी संशयितांची संख्या ही शंभराच्यावर जाणार असल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भुसावळातील संतोषीमाता अर्बन को-ऑप. सोसायटीचे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे असून, यात व्हाइट कॉलर आरोपी आहेत. त्याशिवाय भुसावळातीलच व्यंकटेश नागरी पतसंस्थेतही पावणेतीन कोटी रुपयांचा अपहार झाला असून, यासंदर्भात तब्बल सात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. गोजोरे (ता. भुसावळ), चोपडा, मेहुणबारे, जळगाव व पाचोरा येथील आर्थिक घोटाळ्यांबाबत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
फुले महामंडळात साडेसहा कोटींचा घोटाळा
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळात अधिकारी, बँक अधिकारी, कर्मचारी व दलाल यांनी मिळून साडेसहा कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. बोगस लाभार्थी दाखवून पैसे उकळण्यात आलेले आहेत. ७०२ लाभार्थ्यांची यादी पोलिसांच्या हाती लागलेली आहे. यात बँक अधिकारी, महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व काही एजंट अशा सात जणांना अटक करण्यात आली आहे. भुसावळ येथील संतोषीमाता, व्यंकटेश यांसह इतर संस्थांमध्ये अपहार झाला आहे.
बीएचआर प्रकरण राज्यभर
बीएचआर संस्थेतील संचालकांनी केलेला घोटाळा व त्यानंतर ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली, त्या अवसायकानेही यात हात धुऊन घेतले. थोडक्यात ‘धुण्यावर धुणं... आणि कुंपणानेच शेत खाल्ले’ असा प्रकार बीएचआर प्रकरणात झाला आहे. सध्या हे प्रकरण राज्यभर गाजत असून, संचालक मंडळ अजूनही कारागृहात आहे तर अवसायक जितेंद्र कंडारे व उद्योजक सुनील झंवर मात्र अजूनही मोकाटच आहेत.
कोट...
आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणे अतिशय क्लिष्ट असतात. तपासाला खूप वेळ लागतो. संपूर्ण पुरावे हाती आल्यावरच अटकेची कारवाई करता येते. सर्वच प्रलंबित गुन्हे तातडीने निकाली काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ४४ प्रकरणांना गती देण्यात आलेली आहे.
-डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक