मुक्ताईनगर : प्रथम पावसाची ओढ आणि आता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अधिक पावसामुळे तूर वगळता खरीप हंगामातील प्रत्येक पिकाला कमी-अधिक प्रमाणात फटका बसला आहे. सोयाबीन, मूग, उडीद पिकांनंतर आता कपाशीवरही अति पावसाचा परिणाम होऊन मर रोग आणि बोंड सडून गळत आहेत. पांढरे सोने काळवंडले जात असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. एकंदरीत खरीप पीक तालुक्यातील उंबरठा उत्पादनापासून कोसोदूर दिसून येत आहे.
पेरणीनंतर सातत्याने पावसाने ओढ दिल्याने दुबार- तिबार पेरण्या झाल्या. यात आज रोजी खरीप पिकांची अवस्था बिकट आहे. सुरुवातीस पाऊस नसल्याने कापसाच्या पिकांची वाढ खुंटली आणि आता सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात अति पावसाने कापसाची वाट लावली आहे. पहिले कोरड पडली. नंतर ओल निघेना अशी स्थिती झाली. जास्तीचा पाऊस झाल्याने शेतशिवरातून पाण्याचा निचरा झाला नाही. काही शेतात डबके साचले होते.
कापसाची बोंड सड आणि गळ
कधी कोरड, तर कधी शेतशिवारात पाण्याच्या निचऱ्याअभावी सततची ओल आणि वातावरणात आर्द्रता यातून कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. काही भागात बोंडे सडू लागले, बोंडे गळून पडू लागलीत. यातून हाती येणारे पांढरे सोने काळवंडले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. पावसाअभावी मुळे कमजोर होवून अपूर्ण पोषण झाले. कमकुवत पिकावर आता अति पावसाचा मारा पडला. यामुळे कापसावर रोगराई वाढण्याचे सावट आहे. ही परिस्थिती पाहता कापूस पिकाचे निम्मे उत्पादन होईल, असे भाकीत कापूस उत्पादकांकडून वर्तविले जात आहे.
कापूस मर रोग...
झाडे पिवळी व मलूल पडून मर (विल्ट) रोगाची लक्षणे आढळतात. पाने पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. रोगग्रस्त झाडात जांभळ्या-लाल रंगद्रव्याचा विकास झाल्याचे दिसून येऊ शकते.
नियंत्रण मिळविण्यासाठी खबरदारी
शेतातून पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अतिशय महत्त्वाचे आहे.
प्रदीर्घ काळ कमी पाण्याचा ताण पडू देऊ नये.
भारी जमिनीत शेणखताचा आणि रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा.
प्रादुर्भावाची लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी, कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
कपाशीची बोंडे सड...
काही प्रमाणात बोंडावरील करपा रोगाच्या जिवाणूंमुळे बोंडं सडतात.
ढगाळ वातावरण, सतत पाऊस आणि हवामानातील अधिक आर्द्रता यामुळे बोंडाच्या आतून रोगकारक बुरशीचा संसर्ग कळ्यावर, बोंडावर होतो. रसशोषक ढेकूणमुळे ही बोंडे सडतात.
नियंत्रण...
बाधित पाकळ्या हाताने काढणे.
पाते, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना रस शोषणाऱ्या ढेकूण किडीचा प्रतिबंध करणे.
सततचे ढगाळ वातावरण, तसेच हवेतील आर्द्रता व पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारी म्हणून पाते, फुले विकसित होण्याच्या अवस्थेत असताना कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्याने १५ दिवसांनी फवारणी करणे.
आंतरिक संसर्गासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्ल्यू) २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.२ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करवी.
बाहेरील बुरशी रोखण्यासाठी कार्बेन्डाझिम (५०% डब्ल्यूपी) एक ग्रॅम किंवा पायरस्क्लो स्ट्राबीन (२० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम गरजेनुसार फवारणी.