एरंडोल : साधारणपणे पोलीस कर्मचारी हे आपल्या वरिष्ठांसमोर गेल्यावर सर्वप्रथम सॅल्युट करून सलामी देतात व नंतरच कामाविषयी बोलतात. पोलिसांची ही शिस्त पाळून गावागावांत जाऊन व्यावसायिक, विक्रेते, प्रतिष्ठित नागरिकांच्यासमोर जाऊन सॅल्यूट ठोकून विनोदात्मक शैलीचे संभाषण अशी संवादफेक करतात.
साहेबराव राजाराम शिंदे नावाचा 'जनता हवालदार’ नुकताच एरंडोल येथे आला होता व त्याने धमाल उडवून दिली होती. अनेकांना त्याची ओळख पटणे कठीण झाले होते. ‘लग्नाला चला बाई लग्नाला चला.. सासऱ्याचं लग्नं-मेहुणीचं जाऊळ-सासूची ओटी भरणं-साहेबांची वरात’,या संवादाने त्याने नागरिकांचे मनोरंजन केले आणि या कलेतून आपण बहुरूपी असल्याची ओळख त्याने करून दिली.
ट्विटर हँडल, फेसबूक आदी विविध सोशल मीडियाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात विविध सोंग वठवून जनतेची करमणूक करणारी ही परंपरागत कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. साहेबराव शिंदे हे पाचोरा येथील रहिवासी असून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी ते हुबेहूब पोशाख करून विविध व्यक्तिरेखांचे सादरीकरण उपस्थितांसमोर करतात. शासनाने बहुरूपी कलाकारांसाठी अनुदान देऊन आम्हास मदत करावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.