शुक्रवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर तीनचाकी व चारचाकी वाहने धूळखात पडलेली दिसून आली. यामध्ये नेरीनाकापासून ते अजिंठा चौफुलीपर्यंतच्या रस्त्याची दोन्ही बाजूने पाहणी केली असता, चार ते पाच बेवारस वाहने पडलेली दिसून आली. या वाहनांबाबत तेथील एका व्यावसायिकाने सांगितले की, गेल्या वर्षभरापासून ही वाहने या ठिकाणी पडलेली आहेत. ही वाहने दुरुस्तीसाठी आलेली नाहीत. या गाड्यांमध्ये मोठा बिघाड असल्यामुळे संबंधित वाहन मालकांनी घरासमोर लावण्यापेक्षा या ठिकाणी लावून जाणे पसंत केले आहे. मात्र, याचा त्रास येथील व्यावसायिकांना होत असल्याचे सांगण्यात आले.
तसेच महामार्गावरही खोटेनगर स्टॉपच्या पुढे एक बेवारस कार उभी असलेली दिसून आली. इतकेच नव्हे तर शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या महापालिकेच्या इमारती समोरच गेल्या सहा महिन्यांपासून एक निळ्या रंगाची कार उभी असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. या कारबाबत मनपा प्रशासनाला माहिती देऊनही त्यांनी कार मालकावर अद्याप कारवाई केली नाही. ही कारदेखील उचलत नसल्याचे सांगण्यात आले. तर अशा बेवारस कारच्या माध्यमातून शहरात कुठला गैरप्रकार घडला तर, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
मनपा इमारतीच्या खाली गोलाणी मार्केटसमोर गेल्या सहा महिन्यांपासून एक निळी कार उभी आहे. या कारबाबत मनपातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. मात्र, प्रशासनाने ही कार अद्याप उचललेली नाही. या कारमुळे इतर वाहन चालकांना वाहतुकीला अडसर होत आहे.
सुरेश पाटील, व्यावसायिक.
फुले मार्केटात एका दुकानासमोर गेल्या काही महिन्यांपासून एक दुचाकी पार्किंग करण्यात आली होती. तेथील व्यावसायिकही त्या गाडीला हात लावत नव्हते. शेवटी मी शहर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर, त्यांनी ही दुचाकी पोलीस स्टेशनला जमा केली आहे.
लाला भावसार, व्यावसायिक.
नेरी नाकापासून ते थेट अजिंठा चौफुलापर्यंत अनेक ठिकाणी बेवारस वाहने उभी आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने जरी येथील व्यावसायिकांची वाहने असली तरी, ती उचलून जप्त केली पाहिजेत. रस्त्यावर वाहने पार्किंग करण्याचा कुणालाही अधिकार नाही.
प्रताप पाटील, नागरिक.
पोलीस अधिकारी म्हणतात, कारवाईचे अधिकार मनपाला..
-शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांबाबत लोकमत प्रतिनिधीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांना विचारले असता, त्यांनी आमचे काम वाहतूक सुरळीत करण्याचे आहे. ही कारवाई मनपानेच करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
- तसेच वाहतूक विभागातर्फेही रस्त्यात कुणी वाहन उभे केले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईच सुरूच असते. तसेच रस्त्यांलगत उभे असलेली वाहने उचलण्यासाठी मनपाकडे आम्ही क्रेन मशीन मागितले होते. मात्र, मनपाने त्या वाहनात तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितल्यामुळे काही महिन्यांपासून ही कारवाई झाली नसल्याचेही कुनगर यांनी सांगितले.