२२ सीटीआर ३३
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोण होणार करोडपती या एका मराठी वाहिनीवरील ‘कर्मवीर विशेष भागात’ दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात जिंकलेली तीन लाख २० हजारांची रक्कम ते मनोबल प्रकल्पाला देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गेल्या महिन्यापासून कोण होणार करोडपती हा कार्यक्रम एका मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कार्यक्रमात आठवड्यातून एक दिवस कर्मवीर विशेष भाग असतो. या कर्मवीर विशेष भागासाठी शनिवारी जळगावातील दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांना निमंत्रित केले गेले होते. सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तींना कर्मवीर या विशेष भागात निमंत्रित केले जाते. शनिवारी रात्री ९ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. अभिनेते सचिन खेडेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्यांनी मोठी रक्कम जिंकली. ती रक्कम दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाच्या बांधकामासाठी देणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे कार्यक्रमातील कर्मवीर या भागासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सहभागी होणारे यजुवेंद्र महाजन हे पहिले खान्देशवासी ठरले आहेत.