सुनील पाटील
जळगाव : गेल्या काही दिवसापासून शहरात रिक्षाचालकांची गुंडगिरी वाढली आहे. रिक्षाच्या व्यवसायाच्या नावाखाली काही जणांनी प्रवाशांना मारहाण करून लुटण्याचा उद्योगच सुरू केलेला आहे. काही मोजक्या गुंडगिरी करणाऱ्या या रिक्षाचालकांमुळे इतर रिक्षाचालक, मालक बदनाम होत आहेत. शहरात काही जणांनी तर टोळ्याच निर्माण केलेल्या आहेत. छेडखानीच्या प्रकारामुळे महिलांमध्येदेखील असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.
एकीकडे दिवसभर राबून प्रामाणिपणे दोन-चारशे रुपये कमवून सुखाने दोन घास खाणारे काही रिक्षाचालक आहेत तर दुसरीकडे संध्याकाळी दारू व मौजमस्तीच्या सोयीसाठी प्रवाशांना लुटणारे आहेत. काही जणांनी तर गुन्हेगारी कृत्यासाठीच रिक्षाचा वापर सुरू केलेला आहे. जामनेर येथील एका व्यापाऱ्याला गेल्या पंधरवाड्यात मारहाण करून लुटण्यात आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. शनिपेठ पोलिसांनीदेखील काही महिन्यापूर्वी परप्रांतीय वृद्धाला लुटणाऱ्या रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांना अटक केली होती. दरम्यान, प्रवाशांना विश्वास व दिलासा देण्यासाठी या प्रवृत्तींना ठेचणे गरजेचे असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
विनापरवाना रिक्षाचालक एक डोकेदुखी
शहरात निम्म्यापेक्षा जास्त रिक्षा चालकांकडे परवाना नाही. काही रिक्षांची मुदतच संपलेली आहे, तर काही जणांकडे ना बॅच ना बिल्ला अशी स्थिती आहे. काही वर्षांपूर्वी विनापरवानाधारक रिक्षांवर पोलिसांनी कारवाई केली होती. तेव्हा संघटनांनी आंदोलन केले होते. आज अनेक रिक्षाचालक प्रामाणिकपणे कार्य करतात. प्रवाशांशी सौजन्याने वागतात तर काहीजण पुरुषच नाही तर महिलांशीही उध्दटपणाने वागतात, त्यांच्या या कृतीमुळे सर्वच रिक्षाचालक बदनाम होत असून ही एक डोकेदुखीच वाढलेली आहे.