लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम(एमसीव्हीसी) बंद करण्याचे परिपत्रक शासनाने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चार शासकीय संस्था या आयटीआयकडे वर्ग केल्या जाणार आहे. त्यामुळे आता या व्यावसायीक प्रशिक्षणाचे नेमके काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. एकीकडे सरकार मुलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणार असल्याची भूमिका आग्रहाने मांडत आहे. तर त्याचसोबत ही यंत्रणा बंद केली जात असल्याने विद्यार्थ्यामध्ये नाराजी पसरली आहे.
१९८८ च्या सुमारास केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्य शासनाने व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण देऊन जास्तीत जास्त युवकांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी राज्यात हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यानुसार सध्या राज्यातील ५३ आणि जिल्ह्यातील शासकीय ४ संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मात्र हा अभ्यासक्रम आता बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय संस्था या जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे होत आहे नुकसान
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एम.सी.व्ही.सी) हा बंद करण्यात आला आहे. या अंतर्गत सध्या जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही त्याची अखेरची बॅच असेल. आता यंदा नवीन विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश मिळणार नाही. त्यात दोन उपशाखा असतात. त्यात एक तांत्रिक आणि दुसऱ्या शाखेत तांत्रिक अभ्यास नसतो. त्यासोबतच इतर संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी एक अतिरिक्त पर्यायी विषय म्हणून याची निवड करु शकतात. आता पुढे ज्यासंस्थांचे विद्यार्थी या चार तांत्रिक विद्यालयांमध्ये शिकत होते. त्यांना या व्यवसाय शिक्षणाला मुकावे लागु शकते. काॅम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या सोबत इतर विषयही त्यात शिकवले जात आहेत.
कोट - हा अभ्यासक्रम सरकारला चालवायचा नसेल तर त्यांनी तो किमान बंद तरी करावा. हा अभ्यासक्रम चालवतांना त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. आणि संस्था चालकांनाही दिशा मिळत नाही. अनुदानितचा शिक्षक वर्ग निवृत्त झाला आहे. आता हा अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्वावर चालवला जात आहे. यातील काही विषयांचा विद्यार्थ्यांना खरोखरच फायदा होतो. त्यामुळे हे विद्यार्थी नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकतात. तर काही विषयांचा विद्यार्थ्यांना फारसा फायदा होत नाही. - नंदकुमार बेंडाळे, अध्यक्ष, केसीई सोसायटी.
विद्यार्थी कोट
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या यात फक्त शासकीय संस्था बंद होणार आहे. त्यामुळे पुढे प्रवेश मिळणार नाही. ज्यांनी आधी प्रवेश घेतला होता. त्यांना या अभ्यासक्रमाचा फायदा झाला आहे. - अनुप सोनवणे, विद्यार्थी
हा अभ्यासक्रम बंद झाला आहे. त्यामुळे आता नंतरच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळणार नाही. तसेच त्यांना पुढच्या काळात पर्यायी विषय देखील घेता येणार नाही. त्यांना शासकीय नाही तर इतर संस्थांमध्ये हा विषय घेऊन शिकावे लागेल. - आनंद पाटील, विद्यार्थी
आकडेवारी
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या जिल्ह्यातील संस्था
शासकीय - ४
अनुदानित - ५२
विनाअनुदानित - १
एकुण प्रवेश क्षमता - ५५८०