ख्रिस्त पश्चात सहावे शतक. बोधीधर्म विचलित झाले होते. चीनमधल्या ‘शाओलिन’ मठाच्या जवळच्या एका गुहेत त्यांचे तप सुरू होते. बुद्धधर्माचा प्रसार करण्यासाठी ते भारतातून चीनमध्ये आले होते. सतत नऊ वर्षे ध्यान करायचे व्रत त्यांनी घेतले होते. ध्यानाला बसून सात वर्षे पूर्ण झाली होती आणि आता, लक्ष्य जवळ आल्यानंतर, त्यांच्या नश्वर शरीराने त्यांना दगा दिला होता. त्यांना झोप अनावर झाली होती! त्यांनी मन एकाग्र करायचा निक्षून प्रय} केला. समोरच्या भिंतीकडे गेली सात वर्षे त्यांनी टक लावून, पापणी न लववता पाहिले होते. आता मात्र...त्यांनी दीर्घ श्वास घेतला, भ्रू-मध्यावर लक्ष केंद्रित करायचा प्रय} केला, पण व्यर्थ! शेवटी त्यांच्या पापण्या मिटल्याच. इतकी वर्षे तपश्चर्या करूनही त्यांना स्वत:च्या रागावर ताबा मिळवता आला नव्हता. संतापाच्या भरात बोधीधर्मानी दगा देणा:या आपल्या पापण्या उखडून टाकल्या. प्रायश्चित्त घेण्याच्या नादात त्यांनी त्या उकळत्या पाण्यात टाकल्या आणि त्यांचा काढा ते प्यायले, आणि काय आश्चर्य.. त्यांची झोप कुठल्या कुठे पळून गेली. त्यांना शांत वाटू लागले. मनातले विकार नष्ट होऊ लागले. श्वास सुरळीत झाला, छातीतली धडधड कमी झाली. उरलेला काढा जिथे फेकला, तिथे एक अद्भुत झाड उगवले. पाहता पाहता चांगले पाच सहा फूट उंचीचे ते झाले. त्याची पालवी मनोरम होती. कोवळ्या हिरव्या रंगावर अजब सोनेरी छटा पसरली होती. सोनेरी ते शेंडे कसे चमचम करत होते. नीट पाहिल्यानंतर लक्षात येत होते.. शेंडय़ावर तीन पाने होती. बाजूच्या दोन पानांत लपलेली ‘कळी’ म्हणजे खरं तर एक पान होतं. मात्र ते अजून घट्ट मिटलेलं होतं म्हणून एखाद्या कळीसारखं दिसत होतं. एक कळी दोन पाने असलेले ते झाड कशाचे असावे? बोधीधर्माच्या शिष्यांनी त्या झाडाचे शेंडे खुडून काढा केला, आणि प्रसाद म्हणून भक्तीभावाने तो काढा प्यायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य! त्याचे अनेक फायदे त्यांना दिसू लागले. मुख्य म्हणजे बुद्ध भिक्षूंच्या ध्यानधारणेसाठी या निरुपद्रवी पेयाचा खूप उपयोग होता. ध्यानात अडथळा आणणारी, झोप दूर करणारे, त्यांना जागृत ठेवणारे हे पेय होते. ‘बुद्ध’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘जागृत होणे’ असा आहे. बौद्ध मठातल्या दैनंदिन जीवनात या पेयाचा वापर सर्रास होऊ लागला. बौद्ध मठात त्याचा प्रसार जसा वाढला, तशी त्याबद्दलची मिथकंही. बोधीधर्म नव्हे तर साक्षात सांख्यमुनींनी [बुद्ध] स्वत:च्या पापण्या उखडल्या, असे मिथक तयार झाले. ह्या पेयाला धार्मिक अधिष्ठान लाभले. बौद्ध मठातून हळुहळू हे औषधी पेय चीन आणि जपानच्या उच्चभ्रू वर्गात आणि तेथून तळागाळातल्या जनतेर्पयत झपाटय़ाने पोहोचले आणि चिनी आणि जपानी संस्कारातील अविभाज्य घटक झाले. त्यासाठी चिनी लिपीत विशिष्ट अक्षर तयार झाले. दोन्ही बाजूला फांद्या व गवत आणि मधे मानवी आकृती असलेले हे अक्षर होते. मानवी जीवनाचा आणि निसगार्चा संबंध आणि तोल दर्शवणारे हे अक्षर होते ..‘चा..’
कोणाच्या पापण्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 1:45 AM