नशिराबाद : वर्षानुवर्षापासून नशिराबादकरांना पाणीटंचाईच्या चटके बसत आहेत. १६ कोटींची पाणी योजनाही पाणी पातळी खालावल्याने कुचकामी ठरत असून, सध्या ६ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. याचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
आतापर्यंत मजीप्रा पाणीपुरवठा जलशुद्धीकरण योजना चालवत होती. त्यावेळी अनेकदा अडचणी येऊन शुद्ध पाणीपुरवठा झालाच नाही. त्यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्यात येणाऱ्या विघ्नांचे खापर मजीप्रावर फोडले. नियोजनाचा अभाव व अपूर्ण यंत्रणेमुळे पाणी समस्या कायमच राहिली. मात्र, आता ग्रामपंचायतच्या हातात योजना आली आहे. तरीही शुद्ध पाणीपुरवठा गावकऱ्यांना का मिळत नाही, असा उपहासात्मक प्रश्न आता गावात चर्चिला जात आहे. आता पाणी मिळत नसल्याचे खापर कोणाच्या डोक्यावर, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विकतचे पाणी...
टंचाईमुळे पाण्यासाठी हाल होत आहेत. अनेक जण जारचे विकतचे पाणी घेताना दिसत आहेत. सुमारे २० ते ३० रुपयांपर्यंत मिळत आहे. पाणी जारला वाढती मागणी आहे.
आरओ केंद्र बंद...वीज कापली
ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी मिळावे याकरिता ग्रामपंचायतीने पाच रुपयांमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यातही ग्रामपंचायतीच्या आरोप्रणाली केंद्राचे वीज बिल थकल्यामुळे गावातील आरोप्रणाली केंद्र बंदावस्थेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अल्पदरात मिळणारे शुद्ध पाणीसुद्धा पुरविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे. सुमारे १५ लाखांच्या घरात वीज थकबाकी बिल आहे.
भाग्य उजळणार कधी....
प्रत्येक निवडणुकीत पाणी प्रश्नाला प्राधान्य देऊ, असे आश्वासन देऊन मतांचा जोगवा मागण्यात येतो. निवडून आल्यावर आश्वासन विसरले जाते. पाणीटंचाई आणि नशिराबाद हे समीकरण बदलणार केव्हा? पाणीटंचाईची ओरड लक्षात घेता तात्काळ उपाययोजना व्हावी. अनेकदा पाणी समस्येबाबत आश्वासने मिळाली. मात्र, आजपर्यंत टंचाई कायम आहे. मतांचा जोगवा मागणाऱ्यांनो पाणी..... द्या अशी आर्त हाक ग्रामस्थ देत आहेत. आता तरी नशिराबादकरांचे भाग्य उजळणार का, हा प्रश्न चर्चिला जात आहे.