लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व चित्रपटगृहे ६ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, शहरातील सर्व बाजारपेठा, ट्रान्सपोर्ट व इतर व्यवसाय सुरू असताना केवळ चित्रपटगृहांवरच बंदची कुऱ्हाड का टाकण्यात आली? असा प्रश्न जळगाव चित्रपट प्रदर्शक संघाचे अध्यक्ष महेंद्र लुंकड यांनी उपस्थित केला आहे. चित्रपटगृहांमध्ये ८०० प्रेक्षक क्षमता असताना, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केवळ २५ ते ३० प्रेक्षकांना प्रवेश दिला जात असतानाही जिल्हा प्रशासनाने केलेली बंदी ही चुकीची असल्याचे लुंकड यांनी सांगितले.
मंगळवारी राजकमल टॉकीजमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत लुंकड बोलत होते. शहरातील चित्रपटगृह चालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आयनॉक्सचे व्यवस्थापक वैभव शाह, पीव्हीआरचे व्यवस्थापक आकाश सिंग, अशोक टॉकीजचे इंद्रवधन त्रिवेदी व महेंद्र लुंकड आदी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नवीन चित्रपट प्रदर्शित होत नसून, जुनेच चित्रपट दाखविले जात आहेत. त्यातच प्रेक्षकदेखील येत नसल्याने चित्रपटगृहात गर्दीदेखील होत नाही. यामुळे चित्रगटगृहे सुरू करण्यात यावीत अशी मागणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळली असून, सात दिवस चित्रपटगृहे बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असल्याची माहिती लुंकड यांनी दिली. दरम्यान, चित्रपटगृहे बंद असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, अजून काही दिवस चित्रपटगृहे बंद राहिल्यास अनेकांचे रोजगार जातील असेही लुंकड यांनी सांगितले.