शहरात भुयारी गटार योजनेच्या कामाला आता वेग आला आहे. मनपा प्रशासनाच्या एका चुकीमुळे भुयारी गटार योजनेतंर्गत खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम मक्तेदारावर न सोपविता ते काम मनपा प्रशासनालाच करावे लागत आहे. खड्डे बुजविण्यात मनपा प्रशासनाची पीएच.डी आहे, अशा अविर्भावात ही जबाबदारी मनपाने मक्तेदारावर न सोपविता आपल्याकडेच ठेवली आहे. मात्र, हे कामदेखील मनपा प्रशासनाला चांगल्या प्रकारे करता येत नसल्याचे दिसून येत आहे. भुयारी गटार योजनेमुळे खोदण्यात आलेल्या चाऱ्यांमुळे शहरात दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. अवकाळी पावसानंतर या चऱ्या अधिकच धोकादयक ठरत आहेत. सोमवारी सायंकाळी नगरसेविका जयश्री महाजन यांचाही याच खड्ड्यांमुळे अपघात होऊन, त्या जखमी झाल्या आहेत. ज्या महापालिकेत लोकप्रतिनिधींचेच असे हाल होत असतील तर सर्वसामान्यांकडे कोण पाहणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. भुयारी गटार योजनेचे काम मनपासमोरील रस्त्यालगतदेखील झाले. मात्र, हे काम संपल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. रस्त्याची दुरुस्ती करणे चांगली बाब असली तरी ही तत्परता केवळ मनपासमोरील रस्त्यावरच का ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. जेव्हा ही रस्ते दुरुस्ती किंवा इतर सुविधांची बाब येते तेव्हा सर्वसामान्यांचा विचार सर्वांत शेवटी का केला जातो ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी असो वा इतर अधिकारी त्यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यांचीही अशाच प्रकारे काही दिवसांतच दुरुस्ती करण्यात आली होती. मनपाने ही तत्परता केवळ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींसाठी न दाखविता सर्वसामान्यांसाठी देखील दाखवावी.. कारण मनपातील अधिकाऱ्यांचे वेतन देखील सर्वसामान्यांचा करामुळेच होते हे विसरता कामा नये, त्यामुळे करदात्यांचा आधी विचार होणे गरजेचे आहे.
मनपाची तत्परता सर्वसामान्य नागरिकांसाठी का नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:37 AM