जळगाव: मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे.
खडसे पुढे म्हणाले की, मला मंत्री मंडळातून काढले, आमदारकीचे तिकीट नाकारले, याचे मला कोणतेही दु:ख नाही. परंतु विविध खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा कट व पक्षांतर्गत आप्तस्वकियांनी केलेले बदनामीचे षडयंत्र जिव्हारी लागले आहे. आतापर्यंत माझ्याकडे या कटकारस्थानाचे पुरावे नव्हते आता पुरावे जमा झाले आहेत. त्यामुळे ते मी जनते समोर आणणार आहे.
दाऊदच्या बायकोला फोन केला हा आरोप तसेच पुण्याची ती जमीन एमआयडीसीची आहे, हा दावा होऊ शकत नाही. एका पाठोपाठ एक आरोप करीत चौकशी लागली. सर्वांना क्लीन चिट मिळाली, पण माझा छळ सुरुच राहिला. निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशीच्या नावाखाली त्रास दिल्याचे ते म्हणाले.
दाऊदच्या बायकोला फोन केला हा आरोप करणारा हॅकर मनीष भंगाळे यात कसा आला. माजी मंत्री कृपाशंकर, समाजसेविका अंजली दमानिया असे एका पाठोपाठ या प्रकरणात कसे आले. बातम्या पेरल्या व माझी मीडिया ट्रायल कशी सुरू झाली. याचे सबळ पुरावे मी ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ या पुस्तकात देणार असल्याचे खडसे म्हणाले.
दाऊदच्या बायको प्रकरणात जर माझे नाव घेतले तर त्या कथित फोन कॉल यादीत भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही.सतीश यांचे ही नाव होते, ती बाब मीडिया समोर का आली नाही असा सवाल त्यांनी केला. एका मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाचे महिलेसोबचे आक्षेपार्ह स्वरूपातील फोटो आपण वरिष्ठांकडे पुरावे म्हणून दिले आहेत. मात्र त्यावरही कारवाई झाली नाही.
ओबीसींचे राजकारण संपविण्यासाठी माझ्यासह, बावनकुळे, पंकजा मुंडे यांना कसे बाजूला केले गेले. माझ्या मुलीला निवडणुकीत पाडण्यासाठी प्रयत्न झाले. त्याचे पुरावे मी पक्षाकडे दिले आहेत. ज्यांना मी पुढे आणले, संधी दिली त्यांनीच कारस्थान करून मला संपविण्याचा प्रयत्न झाला आहे.
राज्यात भाजपतील नेत्यांच्या हट्टामुळे हातात आलेल सरकार हातातून सुटले याचे दु:ख आहे. आपण विरोधीपक्ष नेते होतो. त्यामुळे आडवे येणाºयांना आडवे करण्याचा आपला स्वभाव आहे. त्यामुळे कट कारस्थान करणाºयांना सोडणार नाही आणि प्रकरण तडीस नेईपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
देवेंद्रजी अजित दादांवर टिका करूच शकत नाहीत
देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका करूच शकत नाहीत. कारण त्यांनी आपले सर्व सत्व-तत्व सोडून त्यांच्यासोबत तीन दिवस संसार केला आहे. त्यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. यासाºयात त्यांनी नैतिकता घालविली आहे. त्यामुळे ते अजितदादा यांच्यावर टिका करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व कटकारस्थानाचे पुरावे मिळाले आहेत. अद्याप तरी हा प्रश्न पक्षा अंतर्गत आहे. याबाबत वरिष्ठांना भेटलो आहे. आता पुरावे ही देणार आहे. कारवाई झाली नाही तर पुढची दिशा ठरवू.एकनाथराव खडसे, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य.