लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कापसाला भाव मिळावा व जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासंर्दभात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाने काळे झेंडे दाखविण्याची भूमिका घेतल्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपला त्यांनी जोरदार उत्तर दिले. मी नालायक होतो तर ४० वर्ष तुम्ही माझ्या हाताखाली काम का केले असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत तुम्ही सरकार स्थापन केले, तेव्हा ते तुमचे मालक होते का? असा सवालही खडसे यांनी केला.
आमदार एकनाथ खडसे यांनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज त्यांच्यावर आम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती. त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे, ते सांगतात तसंच ते करतात अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जळगावातील आगमनावेळी टिका केली. या टिकेचा खडसे यांनी जोरदार समाचार घेतला.
देवेंद्र फडणवीस वैयक्तिक पातळीवर उतरत असून हा त्यांचा बालीशपणा आहे. त्यांनी शेतक-यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी. वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा आपल्या कर्तव्याला महत्व द्यावे असा सल्ला त्यांनी दिला. ते ज्या पक्षात आहे, त्या पक्षात असताना मी त्यांचा मालक होतो. काही वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी अजित पवार त्यांचे मालक होते का? असा सवाल त्यांनी केला.आणि मी जर नालायक होतो तर इतके वर्ष तुम्ही माझ्या हाताखाली काम का केले असा सवालदेखील त्यांनी केला.