लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आरटीई २००९ नुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र अद्याप ही स्वाध्याय सक्तीचा केला असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांची तारांबळ उडत आहे. स्वाध्याय सक्तीचा करण्यात येऊ नये, अशी मागणी काही पालकांकडून होत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. यातील जे विद्यार्थी ऑनलाइन होते त्यांचे अंतर्गत मूल्यमापन आणि जे ऑफलाइन होते किंवा ज्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्याच नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आरटीई २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले. एवढेच नाही तर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही थोड्याफार प्रमाणात मूल्यमापन करून सरसकट उत्तीर्णतेचा निर्णय घेण्यात आला. तसेच दहावीची परीक्षा रद्द करून बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. असे असताना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेला स्वाध्याय हा उपक्रम मात्र अद्यापही सुरूच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवण्याची सक्ती शिक्षकांवर केली जात आहे. विद्यार्थी त्यांच्या घरी असताना शिक्षक हा स्वाध्याय त्यांच्याकडून कसा सोडवून घेणार? त्यासाठी शिक्षकाला आपला जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांच्या घरी जावे लागेल. कारण ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नसल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. सरसकट उत्तीर्णतेचा निर्णय घेतल्यावर आता स्वाध्यायाची सक्ती कशाला? असा प्रतिप्रश्नही पालक व विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. यावर शिक्षणाधिकारी यांच्या संपर्क साधला असता, तो झाला नाही. जळगाव जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात ६ लाख २१ हजार ९४६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी २ लाख ७३ हजार विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेतात. इतर विद्यार्थ्यांचा सहभाग नसतो. त्यामुळे काही तज्ज्ञ शिक्षकांनी सुद्धा स्वाध्याय सक्तीचे न करण्याची प्रतिक्रिया दिली आहे.