पश्चिम महाराष्ट्रानंतर उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेता रडारवर :
लोकमत न्यूज नेटवर्क
अजय पाटील,
जळगाव: राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषद असो वा महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये नवीन राजकीय समीकरणे तयार होत आहेत. ज्याप्रकारे महापालिकांच्या निवडणुकांमध्ये तत्कालीन भाजप सरकारच्या मंत्र्यांनी साम, दाम, दंड व भेदच्या राजकारणाचा वापर करून सत्ता मिळविली होती. आता त्याच राजकारणाचा वापर विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसून येत आहे. सांगली महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही महापौरपद राष्ट्रवादीकडे गेले. आता हाच कित्ता जळगाव महापालिकेतदेखील शिवसेनेकडून गिरवला जात असून, भाजपचे तब्बल २७ नगरसेवक आपल्या गळाला लावून सेनेने महापालिकेवर भगवा फडकाविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, यासाठी सांगलीनंतर जळगाव महापालिकाच सत्ताधाऱ्यांनी का निवडली ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तत्कालीन भाजप सरकारमधील महसूलमंत्री व भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगलीमध्ये दणका दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात असलेल्या गिरीश महाजन यांना खिंडीत गाठण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. यासाठी जळगाव महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठी लावण्यात आलेली निवडणूक सेनेसाठी आयती संधी ठरली आहे.
‘संकटमोचका’ला घेरण्यासाठी सेनेचे राज्याचे नेतेही झाले सक्रिय
शिवसेनेनेदेखील भाजपच्या संकटमोचकांना संकटात टाकण्याची कोणतीही संधी आता सोडलेली नसून, त्यामुळे भाजपचे स्पष्ट बहुमत असलेल्या सांगली महापालिकेनंतर आता जळगाव महापालिकेतील सत्ता भाजपच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक व अहमदनगरमध्ये भाजपची एकहाती सत्ता आणण्याचा करिश्मा केलेल्या गिरीश महाजन यांच्या हातातून सत्ता खेचणे अवघड असले तरी राज्यात फडणवीसांनी सचिन वाझे प्रकरणात अडचणीत आणलेल्या शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाकडून जळगावमध्ये भाजपची सत्ता उखडून फेकण्यासाठी जोरदार रसद पुरविण्याचे आदेश थेट मातोश्रीवरूनच दिले गेले आहेत. यामुळे गिरीश महाजनांना जळगावमध्ये आव्हान दिल्यास फडणवीसांची रसद कमी करण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जळगाव महापालिकेतील ‘ऑपरेशन शिवधनुष्य’साठी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, खा. विनायक राऊत यांच्यासारखे महत्त्वाचे नेतेदेखील सक्रिय भूमिका पार पाडत आहेत.
जिल्ह्यातील नाराज नेत्यांनी एकत्र बांधली मोट
गिरीश महाजन यांनी एकापाठोपाठ जळगाव, धुळे, नाशिक व अहमदनगर महापालिकांमध्ये एकहाती सत्ता आणत राष्ट्रवादी, शिवसेना व कॉग्रेसला दूर ठेवले होते. त्यातच जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे, धुळे जिल्ह्यात अनिल गोटे यांच्यासारख्या भाजपातील नेत्यांनाच थेट आव्हान दिले होते. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, पाचोरा, चोपडा या मतदारसंघात भाजपच्या बंडखोरांना निवडणूक रिंगणात उभे करून त्यांना पक्षाची रसद पुरविल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या आमदारांचीदेखील नाराजी गिरीश महाजन यांनी ओढवून घेतली होती. आता सर्व नाराजांनी मोट बांधून गिरीश महाजन यांच्याविरोधात आघाडीच उघडली असून, ज्या महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर करून गिरीश महाजन भाजपचे संकटमोचक म्हणून उदयास आले होते. आता त्याच महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावून भाजपच्या संकटमोचकालाच संकटात आणण्याचे काम शिवसेनेकडून करण्यात आले आहे.