सुनील पाटील
दंडुक्याची गरजच का भासते !
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, त्याची साखळी तुटावी यासाठी फ्रन्टलाईन वर्कर म्हणून काम करणारी महसूल, आरोग्य व पोलीस यंत्रणा स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेचा जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. रुग्ण व मृत्युसंख्या आटोक्यात यावी व सर्व दैनंदिन व्यवहार, आस्थापना सुरळीत सुरू व्हाव्यात. गरिबांच्या घरातील चुली पेटाव्यात यासाठी प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. केंद्र, राज्य व जिल्हा स्तरावर सतत नवनवीन आदेश निघत आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम या यंत्रणेवर, तर त्याचे पालन करण्याचे मुख्य काम सामान्य नागरिकांवर आहे, असे असतानाही त्याचे पालन होताना दिसत नाही. यंत्रणा आदेश काढते, दुसरी यंत्रणा त्याचे पालन करण्यासाठी रस्त्यावर उतरते आहे. तरीदेखील सामान्य व्यक्ती हा काही ना काही बहाण्याने बाहेर फिरत आहे. कोरोनाबाधित व्यक्ती कळतनकळत लोकांच्या संपर्कात येत आहे. काहीची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्रास जाणवत नसला तरी त्याच्यापासून इतरांना धोका पोहोचत आहे. अनावश्यकरीत्या किंवा क्षुल्लक कारणासाठी बाहेर फिरणाऱ्या बाधितांमुळे इतर लोकांचा जीव धोक्यात येत आहे. यंत्रणा आपले कार्य करीत राहील; मात्र विनाकारण फिरणाऱ्यांना त्याचे गांभीर्य अजूनही कळलेले नाही. ज्याच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला व तो ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर गेला असेल किंवा दुर्दैवाने दगावला असेल तर अशाच व्यक्तीच्या घरातील लोकांना त्याचे गांभीर्य आहे. इतर दुसरे कोणाला त्याचे गांभीर्य जाणवतच नसल्याचे दिसून येते आहे. शेवटचा पर्याय म्हणून की काय पोलिसांनी दंडात्मक कारवाई व दंडुक्याचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. सुशिक्षित व समजदार व्यक्ती यांच्याकडूनच आदेशाचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. त्यांनी स्वतः आदेशाचे पालन करावे व इतरांनाही समजावून सांगितले तरच कोरोनाची साखळी तुटेल व जनजीवन पूर्वपदावर येईल, अन्यथा लाॅकडाऊन सुरूच राहील.