एरंडोल - जवळपास १४ ते १५ महिन्यांपासून एरंडोल शहरासह ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात होता. मात्र, एरंडोल तालुका कोरोनामुक्त झाला आहे. एवढेच नव्हे तर जवळपास तीन आठवड्यांपासून तालुक्यात सलग एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. पण, तरीही कोरोनाचे निर्बंध अजूनही जैसे थे आहेत. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यास तत्काळ सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
एरंडोल तालुक्यातून कोरोनाने गाशा गुंडाळल्याचे चित्र आहे. अशा दिलासादायक स्थितीत श्री क्षेत्र पद्मालयाचे देवालय बंद आहे. दि.२८ जुलै रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी होती. त्या दिवशी देवालय दर्शनासाठी खुले न झाल्यामुळे भक्तांचा हिरमोड झाला. शाळा, महाविद्यालयांची घंटा अजूनही पूर्णवेळ वाजत नाही. म्हणून प्रदीर्घ सुट्टीला कंटाळलेला विद्यार्थीवर्ग शाळा, काॅलेजला जाण्यासाठी आतुर झाला आहे. रोज सायंकाळी चार वाजेनंतर व दर शनिवारी, रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे निर्बंध अजूनही कायम आहे. त्यामुळे व्यावसायिक व विक्रेते यांच्या नाराजीचे रूपांतर संतापात झाल्याचे दिसून येत आहे.
शहरातील बाजारपेठेवर विपरीत परिणाम अधिक तीव्र झाला आहे. तसेच रोजगाराची समस्या गंभीर झाल्याने गोरगरीब कुटुंबांपुढे पोटाची खळगी कशी भरावी? हा प्रश्न आ वासून उभा आहे.