जळगाव : कोरोनामुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ घेण्याची इतकी घाई का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव ॲड. कुणाल पवार यांनी उपस्थित केला आहे.
दीक्षान्त समारंभ हा एक गुणगौरव सोहळा असून विविध विद्याशाखेच्या सुवर्णपदक प्राप्त तसेच पीएच.डी. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव केला जातो. मात्र, दीक्षान्त समारंभ हा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुवर्णपदकाने सन्मानित केले जाणार नाही. दुसरीकडे विद्यापीठातून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठात एकाच ठिकाणी प्रभारी कुलगुरू, परीक्षा नियंत्रक, प्र-कुलगुरू, कुलसचिव तसेच चारही विद्या शाखांचे अधिष्ठाता व काही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. यातील काहींनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, काही प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवस हा दीक्षान्त समारंभ स्थगित करण्यात यावा व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर कार्यक्रम घ्यावा, अशी मागणी ॲड. पवार यांनी केली आहे.