लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक स्वयंसेवी संस्था लोकांच्या मदतीला पुढे आल्या होत्या. त्यावेळी गरजुंना धान्य पुरवणे, इतर मदत करणे अशी कामे या स्वयंसेवी संस्थांनी केली होती; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बहुतांश स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते हाताची घडी अन् तोंडावर बोट करून घरीच बसलेले दिसून येत आहेत. शहरात सध्या शंभरच्या वर स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत; मात्र त्यातील मोजक्याच संस्था कोविड काळात जनतेची मदत करत आहेत.
कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा लॉकडाऊनचा पहिला टप्पा लागू करण्यात आला होता. त्यावेळी मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर भागातून परप्रांतीय कामगार आपल्या गावी परत गेले होते. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय जळगाव शहर तसेच अन्य भागात केली गेली होती. त्यावेळी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या होत्या. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना इतर मदतीसाठीदेखील स्वयंसेवी संस्था पुढे आल्या होत्या; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. १५ फेब्रुवारीपासून कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू कोविड सेंटरमध्ये रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. नंतरच्या काळात प्रशासनाने विविध निर्बंधदेखील लावले. आता तर संचारबंदीदेखील लागू करण्यात आली आहे; मात्र तरीदेखील बहुतेक स्वयंसेवी संस्था अजूनही सामान्यांच्या मदतीला समोर आलेल्या नाहीत.
या स्वयंसेवी संस्था आल्या समोर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत; मात्र आता काही मोजक्या स्वयंसेवी संस्था नागरिकांना मदत करण्यासाठी समोर आल्या आहेत. त्यात निस्वार्थ जनसेवा फाउंडेशन आपल्या फुड ॲम्ब्युलन्समधून अडचणीत आलेल्यांना मदत करत आहेत. ही संस्था सध्या शहरातील ३५० पेक्षा जास्त जणांना दररोजचे जेवण पुरवत आहे. त्यात कोविड रुग्णांचे नातेवाईक, रस्त्यावर राहणारे गरजू, वृद्ध यांना मदत करत आहेत. तर लोक संघर्ष मोर्चातर्फे शहरात मोफत कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यासोबतच जनसेवा फाउंडेशनदेखील नागरिकांना सहाय्य करत आहे.
संस्थांनीच सुरू केले रुग्णालय आणि कोविड सेंटर
शहरातील काही स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांनी कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यासाठी रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर सुरू केले; मात्र त्यासाठी त्यांनी शासनमान्य दराने पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी नागरिकांवर उपचार केले जातात; मात्र त्यासाठी पैसेदेखील आकारले जात आहे. त्यासोबतच सेवारथ परिवारातर्फे डिझेलच्या दरात ॲम्ब्युलन्स पुरवते. तर काही संस्था ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरदेखील रुग्णांना वापरण्यासाठी देत आहेत.