निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती - ७८३
तैनात कर्मचारी - ५ हजार ३००
ड्युटीवर जाण्याआधी चाचणी -१४५
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी जिल्ह्यात ५ हजारहून अधिक कर्मचारी नेमण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचा आता प्रादुर्भाव कमी झाला असला तरी मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा हजारो नागरिकांशी संपर्क आला. मतदानाला जाण्याआधी अनेक कर्मचाऱ्यांनी स्वत:हून तर काहींची प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली. मात्र, मतदान संपल्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट का करण्यात आली नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आता शुन्यावर आला आहे. मात्र,ग्राम पंचायतीच्या निवडणुका या चुरशीचा असतात, त्यामुळे शहरात राहत असलेल्या नातेवाईकांना देखील मतदानासाठी बाहेर गावाहून आणले जाते. त्यातच मतदान केंद्रावर कोरोनाच्या काळात शासनाने आखून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे अशा नियमांचा पुर्णपणे बोजवारा उडालेला होता. तसेच मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांचा सुमारे हजार नागरिकांशी संपर्क येतो. अशा परिस्थितीत मतदान कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक होती. मात्र, मतदान संपल्यानंतर घरी परतलेल्या कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून कोणतीही टेस्ट करण्यात आली नाही. हजारोंच्या सानिध्यात आलेल्या मतदान कर्मचाऱ्यांचा आरोग्याबाबत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात उदासीनता दाखविल्याचे दिसून आले. अनेक कर्मचाऱ्यांनी खासगीत टेस्ट करुन घेतली आहे. तर काहीजण मतदान संपल्यावर लगेच घरी परतले. मात्र, अनेकांशी संपर्क आल्याने मतदान कर्मचाऱ्यांचा मनात धाकधुक अजूनही कायम आहे.
कोट..
मतदानाची ड्युटी करण्यासाठी जाताना कोरोनाबाबत आखून दिलेल्या नियमांचे पालन आम्ही करण्याचा प्रयत्न केल. प्रत्येक मतदाराशी संपर्क आल्यावर सॅनीटायझरने हात धुणे, नेहमी मास्क वापरणे व हातावर देखील ग्लोज घातले होते. मात्र, काही वेळा नजरचुकीचे चुका होवून जातात. त्यामुळे लक्षणे असल्यास मी स्वत: टेस्ट करून घेईल.
-अरुण चौधरी, कर्मचारी,
मतदानाला जाण्याचा आधी काहीही लक्षणे नव्हती. तरीही टेस्ट करून घेतली होती. त्यानंतर मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ज्या प्रकारे नागरिकांशी संपर्क आला आहे. त्यानुसार टेस्ट करावीच लागणार होती. खासगीत जावून टेस्ट करुन घेतली. अहवाल निगेटीव्ह आला आहे. प्रशासनाने यासाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- धनंजय पाटील, शिक्षक
मतदान ड्युटीचे काम संपल्यावर खरतर घरी जायला भिती वाटत होती. आम्ही कोरोनाबाबत आवश्यक सर्व काळजी घेतली होती. मात्र, मतदान केंद्रावर नागरिकांकडून अतिशय दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे प्रशासनाने मतदान ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची टेस्ट करुन घ्यायला हवी, अन्यथा प्रसार होवू शकतो.
-शशिकांत पाटील, कर्मचारी