लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील अजिंठा चौकातील भंगार बाजाराची जागा ही ११७ व्यावसायिकांना ९९ वर्षांसाठी भाडे करारावर देण्याचा ठराव १९९७ मध्ये झाला होता. मात्र, प्रशासनाने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला नसल्याने या ठरावाला मान्यता मिळू शकलेली नाही. प्रशासनाने केलेल्या चुकीचा फटका भंगार बाजारातील दुकानदारांना बसत असून, नगरपालिकेने केलेल्या ठरावानुसार हा करार ९९ वर्षांचाच असल्याची माहिती शहर भंगार बाजार कृती समितीकडून काढण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
तत्कालीन नगरपालिकेने याठिकाणच्या व्यावसायिकांसाठी केवळ मोकळी जागा दिली होती. तसेच ही जागा अपूर्ण पडत असल्याने खासगी जागा घेऊन याठिकाणी व्यावसायिकांसाठी ही जागा उपलब्ध करून दिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ११७ दुकानदारांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह या दुकानांमुळे सुरू आहे. तसेच या बाजाराचे कोणतेही अतिक्रमण नसून, यामुळे वाहतुकीला देखील कोणताही अडथळा निर्माण होत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून वारंवार नोटिसा देऊन याठिकाणच्या व्यावसायिकांवर अन्याय करण्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप या कृती समितीकडून काढण्यात आलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. त्यावर प्रा. डॉ. करीम सालार, वाहाब मलिक, फिरोज खान, शाकीर खान, रशीद खान, अकबर खान यांची स्वाक्षरी आहे.
समितीने अहवाल न देताच ठराव केला मंजूर
भंगार बाजार ताब्यात घेण्याबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी महासभेने तीन जणांची समिती नेमली होती. मात्र, या समितीच्या सदस्यांनी कोणताही अहवाल मनपाकडे न देताच महासभेत बेकायदेशीर अहवालावर ठराव मंजूर करण्यात आला. मनपाने जुना ठराव शासनाकडे रद्द करण्यासाठी पाठविला असून, नवीन ठराव मंजुरीसाठी पाठविला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून, याबाबत भंगार बाजार कृती समितीने शासनाकडे दाद मागितली असून, वेळप्रसंगी योग्य तो लढा देण्याचा इशारा देखील समितीकडून देण्यात आला आहे.