जळगाव : पती-पत्नीत झालेल्या कौटुंबिक वादातून पती मुलीचा ताबा देत नाही, पोलिसांकडे तगादा लावूनही दखल घेतली जात नाही, त्यामुळे अश्विनी पंकज पाटील (रा.विरवाडे, ता.चोपडा ह.मु.गाढोदा, ता.जळगाव) या विवाहितेने संतापाच्या भरात झोपेच्या गोळ्या प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गाढोदा, ता.जळगाव येथे १८ रोजी घडली.दरम्यान, याप्रकरणी पती पंकज अशोक पाटील, सासू रेखा अशोक पाटील, सासरे अशोक विश्राम पाटील व जेठ प्रदीप अशोक पाटील (सर्व रा.विरवाडे, ता.चोपडा) यांच्याविरुध्द बुधवारी जळगाव तालुका पोलिसात छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीत म्हटल्यानुसार, अश्विनी व पंकज यांचा विवाह सोहळा १ फेब्रुवारी २०१७ रोजी विरवाडे येथे झाला आहे. १० ग्रॅम सोन्याची अंगठी, २० भार चांदी व कपाट व इतर भांडी लग्नात दिले होते. काही दिवसानंतर पंकजच्या नोकरीसाठी २ लाख रुपये आणावे म्हणून छळ करण्यात आला. त्यानंतरही वारंवार पैशासाठी छळ करण्यात आला.नातेवाईकांच्या बैठकीत वाद मिटल्यानंतर पंकज पुणे येथे खासगी नोकरीला लागला. दरम्यानच्या काळात अश्विनीने मुलीला जन्म दिला. पुणे येथेही दोन लाखासाठी छळ झाला.९ जानेवारी २०२० रोजी अश्विनीचे वडील पुण्यात आले असता तेव्हा सासरच्या लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी मुलीला हिसकावून घेत अश्विनीला घराबाहेर हाकलून लावले.त्यावेळी शेजारी राहणाऱ्या राहुल शांताराम माने (रा.सातारा,ह.मु.पुणे) याने रात्रीच्यावेळी आसरा दिला. दुसºया दिवशी राहुल हा त्याचे मूळ गाव विखळे, ता.खटाव येथे अश्विनीला घेऊन गेला.दुसरीकडे सासरच्या लोकांनी अश्विनी हरविल्याची पोलिसात तक्रार दिली. ८ मार्च २०२० रोजी राहुल याने पोलिसात जाऊन खात्री केल्यानंतर गावावरुन वडिलांना बोलावून घेतले. तेव्हापासून अश्विनी माहेरी आहे.बेशुध्दावस्थेत आणले पोलिसातमुलीचा ताबा मिळत नाही व पोलीसदेखील मदत करीत नसल्याच्या संतापात अश्विनी हिने १८ रोजी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तशाच अवस्थेत वडिलांनी अश्विनीला तालुका पोलीस ठाण्यात नेले. तिची अवस्था पाहून पोलिसांनी तक्रार घेण्याची तयारी दर्शविली व तेथून तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी शुध्दीवर आल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब घेतला, अशी माहिती अश्विनीच्या वडिलांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन दिली.
पतीकडून मुलीचा ताबा मिळेना पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:55 PM