पाचोरा : पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
फोटो
पाचोरा : पत्नीला नातेवाइकाच्या घरी नेण्याचा बहाणा करून तिला जिवे मारले आणि अपघात झाल्याचा बनाव केल्याचा प्रकार पाचोरा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर पती कोरोनाबाधित आढळून आला आहे.
अश्विनी मुकेश सोनवणे (वय २०, रा. राजीव गांधी नगर, पाचोरा) असे या ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. १४ मे २०१९ रोजी तिचा विवाह पाचोरा येथील वाहनचालक मुकेश रमेश सोनवणे याच्याशी झाला होता.
पती मुकेश सोनवणे, सासू सुमनबाई रमेश सोनवणे, नणंद सविता दिनेश मराठे (भडगाव), कविता रमेश सोनवणे (सोयगाव), रेखा वाडेकर (जळगाव), कुंदा सहाणे (नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ रोजी मध्यरात्री अश्विनी मुकेश सोनवणे हिचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद पाचोरा पोलिसांत दाखल झाली. घटनेची माहिती मिळताच अश्विनीचे आई-वडील व नातेवाईक पाचोरा येथे पोहोचले आणि मुकेश यानेच अश्विनी हिला जिवे मारल्याची फिर्याद तिची आई संगीता दीपक शेलार (रा. मार्केट यार्ड, धुळे) यांनी दिली.
या फिर्यादीनुसार, लग्नानंतर काही दिवसांतच अश्विनी हिच्याशी सासरची मंडळी क्रूरतेने वागायची. आपले नाशिक येथील कुंदा भागवत सहाणे हिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत मुकेश हा अश्विनीचा वारंवार छळ करायचा. तसेच माहेरून चारचाकी वाहन घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला मारून टाकीन, अशी धमकी द्यायचा.
दरम्यान, सोयगाव येथे नातेवाइकांकडे जायचे आहे, असा बहाणा करून २३ रोजी रात्री मुकेश हा अश्विनी हिला घेऊन गेला. पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यान चारचाकी वाहन उलटून अश्विनी ही ठार झाल्याची बतावणी त्याने केली. यानंतर तिला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले; पण इकडे वाहन उलटून मुकेश यास साधे खरचटलेही नाही. इथूनच नातेवाइकाचा संशय बळावला. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी मुकेश यास कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दिला. जावयानेच मुलीचा खून करून अपघाताचा बेबनाव केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.