महिंदळे, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या वलवाडी येथील शेतकरी श्यामराव नथ्थू मोरे यांच्या मालकीच्या गो-ह्यावर वन्य प्राण्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडला. बिबट्याने हा हल्ला केला असावा असा अंदाज वर्तविला जात असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वलवाडी शिवारात श्यामराव मोरे यांच्या शेतात नेहमीप्रमाणे गुरे बांधलेली होती. त्यातील एका गोºह्यावर वन्य प्राणांनी हल्ला चढवून ठार केले. यात शेतकऱ्याचे अंदाजे वीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.पाचोरा-भडगाव वनविभागाचे वनपाल रामदास चौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याचा हल्ला आतापर्यंत परिसरात कुठेही झाला नसल्यामुळे व येथे तसे पावलांचे ठसेही स्पष्ट दिसत नसल्यामुळे लांडगा किंवा इतर वन्यप्राण्यांनी हल्ला केला असावा असे चौरे यांचे म्हणणे आहे. मात्र परिसरात मात्र बिबट्या असल्याचा संशय शेतकरी व्यक्त करीत आहेत. या मुळे आता शेतकरी शेतात बांधलेली गुरे घराकडे घेऊन येत आहेत. जंगलात वन्य प्राण्यांना पाणी नसल्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे वळले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
वलवाडी शिवारात वन्य प्राण्याने पाडला गो-ह्याचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 4:19 PM