जिजाबराव वाघ
चाळीसगाव : सृष्टीची रचनाच एकमेकांना पुरक असल्याने वन्यजीव व मानवी जीवन परस्परालंबी असून जंगल टिकविण्यासाठी वन्यजीवांच्या संरक्षणासह त्यांचे संवर्धनही आवश्यक आहे. यासाठी मानवी सकारात्मक ऊर्जादेखील तेवढीच गरजेची आहे. असे उदबोधन चाळीसगाव वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी येथे केले.
गुरुवारी वन्यजीव सप्ताहाच्या सांगतेला शहरातून वनविभागासह चाळीसगाव सायकल ग्रुप, रोटरी क्लब, शहर पोलिस स्टेशन, वाहतूक शाखा, जाॕगिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव संरक्षण व संवर्धन जागरासाठी सायकल रॕली काढण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
सकाळी सात वाजता रेल्वे स्टेशन येथून हिरवा झेंडा दाखवून त्यांनीच रॕलीचा शुभारंभ केला. एक पासून वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताहातर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. शाळांमध्ये जंगल व वृक्ष संवर्धनाविषयी व्याख्याने देण्यात आली.
एकुण १० किमीच्या रॕलीत भडगाव रोड, करगाव रोड, घाटरोड, नागद चौफुली, टाऊन हाॕल, सदर बाजार, भाजी मंडई, नवा पुल, वीर सावरकर चौक या मार्गे वनविभागाच्या कार्यालय परिसरात सायकल रॕलीची सांगता झाली. रॕलीत वन्यजीवांसोबतच वन संवर्धनाच्या विविध घोषणा देण्यात आल्या. रॕलीत शाळकरी विद्यार्थ्यांसोबत महिला व सायकलवीरांसह शंभर पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते.
यावेळी व्यासपिठावर शितल नगराळे, पोलिस निरीक्षक के. के. पाटील, वन्यजीव संरक्षक, सर्पमित्र राजेश ठोंबरे, विकास शुक्ल, वाहतूक शाखेचे प्रमुख प्रकाश सदगीर, कास्टट्राईब संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रभाकर पारवे, रोटरी क्लबचे सचिव ब्रिजेश पाटील, अध्यक्ष रोशन ताथेड, जाॕगिंग असोसिएशनचे सोपान चौधरी आदि उपस्थित होते. सायकलवीर रवींद्र पाटील, टोनी पंजाबी, अरुण महाजन यांच्यासह वनविभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आभार ब्रिजेश पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन मधुकर कासार यांनी केले.