आॅनलाईन लोकमतबिडगाव, ता. चोपडा, दि.१४ : सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलात कृत्रीम पाणवठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.यंदा एप्रिल महिन्यापासूनच मे हिटचा तडाखा बसू लागला होता. आणि आता प्रत्यक्ष सुरू झालेल्या मे महिन्यात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे सातपुड्यातील पन्नास वर्षात कधी नव्हे ते सर्व नैसर्गिक पाणी साठे प्रथमच आटले आहेत. परिणामी तहान भागविण्यासाठी वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून पाण्याविना कासाविस होणारे प्राणी पाण्याच्या शोधासाठी गावांकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र आपला जंगलातील निवास सोडून येणाऱ्या या प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. त्यांची जीवितहानी होण्याआधीच वनविभागाने सातपुड्यात तात्काळ कृत्रिम पाणवठे उभारावेत अशी मागणी निसर्ग आणि प्राणी मित्रांकडून होत आहे.जेमतेम शिल्लक प्राणीही संकटातआधीच मोठ्या प्रमाणावर सातपुड्यात प्राण्यांच्या संख्येत घट झालेली असून जेमतेम शिल्लक असलेले हरिण, माकड, अस्वल, बिबट्या, लांडगे, कोल्हे, तडस, ससे, मोर, सांबर आदी प्राण्यांचीही पाण्यासाठी दमछाक होत असून प्राणाला मुकण्याची वेळ आली आहे. अशात काही प्राणी तहान भागवण्यासाठी मानवी वस्तींकडे धाव घेत असून त्यांची शिकार होण्याचीही भिती आहे. त्यातच सातपुड्यात वारंवार लागणारे वणव्यानेही प्राणी भयभीत होत असतात. त्यामुळे वनविभागाने या प्राण्याच्या संरक्षणासाठी योग्य ते उपाय करून तातडीने कृत्रिम पाणवठे उभारावे व या प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.प्रथमच येतोय विदारक अनुभवमे महिन्यात दररोजच्या उच्चांकावर तापमान पोहचत आहे. त्यातच यावर्षी सातपुडा परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने जंगलातील झरे आटले असून पाणीसाठे कधीचेच नष्ट झाले आहेत. उरले सुरलेले झरे, तळे उन्हाच्या तडाख्यात सुकले तर सातपुड्याच्याच कुशीत असलेल्या चिंचपाणी धरणातही पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे सातपुडा परिसरात गेल्या पन्नास वर्षात कधी नव्हे ते नैसर्गिक पाणीसाठे यावर्षी नष्ट झाल्याने वन्यप्राण्यासमोर पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
नैसर्गिक साठे आटल्याने सातपुड्यातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 5:42 PM
सातपुड्यातील पन्नास वर्षात कधी नव्हे ते सर्व नैसर्गिक पाणी साठे प्रथमच आटले आहेत. परिणामी तहान भागविण्यासाठी वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून पाण्याविना कासाविस होणारे प्राणी पाण्याच्या शोधासाठी गावांकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
ठळक मुद्दे ५० वर्षात प्रथमच सातपुड्यात विदारक स्थिती पाण्यासाठी वन्यजीवांची मानवी वस्त्यांकडे धाववनविभागाने कृत्रीम पाणवठे तातडीने उभारण्याची मागणी