लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सफाई कर्मचाऱ्यांना नियमितपणे रजा दिल्या जात नाही, पाऊस असो वा थंडी प्रत्येक हंगामात सफाई कर्मचारी हा स्वच्छतेचे काम करत आहे. मात्र, त्यांच्या हक्क व अधिकारांबाबत कोणतेही शासन गंभीर नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्नांसाठी शासनाविरोधात आंदोलनाची भूमिका गुरुवारी शहरातील पद्मावती मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात घेण्यात आली.
या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष चरणसिंग टाक, महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश कछवा, उपाध्यक्ष दिलीप चांगरे यांच्यासह भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात शासनाचे नोकरभरतीबाबत धोरण निश्चित नसल्याने पदाधिकाऱ्यांना शासनाबाबत नाराजी व्यक्त केली. सफाई कर्मचाऱ्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. सातवा वेतन आयोग लागू करावा, सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल विनामूल्य देण्यात यावी, अनुकंपाधारकांची भरती करण्यात यावी, याबाबतच्या मागण्या शासनाकडे करण्यात येणार असल्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला.