जळगाव : ‘एकवेळ व्यवसाय बंद करू, पण पीओपीच्या मूर्ती बनविणार नाही’, अशा ठाम भूमिकेतून गेली ८५ वर्षे दशपुत्रे कुटुंबीय शाडू मातीतील गणेशमूर्ती बनवत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी या कुटुंबातील मूर्तिकार कमालीचे आग्रही आहेत.
सुधाकर दशपुत्रे यांनी सांगितले, की त्यांची आत्या ताराबाई खंडेराव पोतदार जळगावात राहत असत. खंडेराव पोतदार निष्णात वकील होते. वकिली व्यवसाय सांभाळून ते गणपती मूर्ती बनवायचे. ताराबाईंनी व्यवसायात मदतीसाठी नाशिकमधील आपला भाऊ दीनानाथ दशपुत्रे यांना जळगावला बोलावून घेतले. दीनानाथ हे नाशिक सिक्युरिटी प्रेसमध्ये कामाला होते. ते स्वत: मूर्ती तयार करायचे. जळगावला आल्यावर नगरपालिकेत लागले. शाडू मातीच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली. त्यांच्या पश्चात चंद्रकांत व सुधाकर आणि चौथ्या पिढीतील पंकज कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहेत.
पारंपरिक रूपातीलच मूर्तीदशपुत्रे केवळ पारंपरिक रूपातील मूर्ती बनवतात. याशिवाय अन्य रूपात कोणी मूर्ती बनवून मागितल्यास नम्रपणे नकार देतात. ते पहिल्यापासून शाडू मातीमधीलच मूर्ती बनवत आले आहेत. पीओपी वापरणार नाही ही त्यांची ठाम भूमिका आहे.
अशा आहेत मूर्तीसहा इंच ते ४ फुटांपर्यंतच्या मूर्ती आहेत. मूर्तीवर पाण्याचे रंग लावले जातात. ते हाताला लागू नयेत म्हणून खाण्याचा डिंक त्यात घातला जातो.
लहान मूर्तीत दरवाढ नाहीदशपुत्रे यांनी तीन वर्षांपासून लहान मूर्तींमध्ये दरवाढ केलेली नाही. त्यांच्याकडील अधिकतम ग्राहक हा छोट्या मूर्ती घेणारा आहे. दोन हजार रुपयांवरील मूर्तींच्या दरात मात्र, १५ ते २० टक्के वाढ करण्यात आली आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे.
अशी लागायची स्पर्धासुधाकर दशपुत्रे यांचे आजोबा भालचंद्र दशपुत्रे हे देखील नाशिकमधील प्रसिद्ध मूर्तिकार होते. त्यावेळी कोण चांगली आणि वेगळी मूर्ती तयार करतो, अशी त्यांची स्पर्धा इतर मूर्तिकारांशी लागायची, अशी आठवण त्यांनी सांगितली.