कॉँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:03 AM2018-10-07T00:03:34+5:302018-10-07T00:03:46+5:30

पक्षाला सतत अपयश येत रहाणे यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर पक्षाचे धोरण किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता हेच असू शकते

Will the Congress get a turnaround? | कॉँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का?

कॉँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का?

Next

चंद्रशेखर जोशी
राजकीय पक्षांमध्ये पडझड, इकडून तिकडे जाणे हे सुरूच असते. मात्र एखाद्या पक्षाला सतत अपयश येत रहाणे यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर पक्षाचे धोरण किंवा कार्यकर्त्यांची मानसिकता हेच असू शकते. जिल्हा कॉँग्रेसच्या बाबतीत नेमके असेच होत असल्याचे लक्षात येते. महापालिकेची २०१३ मध्ये निवडणूक झाली त्यावेळी कॉँग्रेस पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी अनेक दावे केले होते. मात्र ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी या पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. वास्तविक त्यावेळी हा पक्ष सत्तेत होता. त्यानंतर २०१४ मध्ये प्रथम लोकसभा निवडणूक लागली. या निवडणुकीतही पक्षाची धुळधाण झाली. त्यानंतर याच वर्षात विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीतही पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. एकेकाळी कॉँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख होती. माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील, स्व. मधुकराव चौधरी, स्व. जे.टी. महाजन, स्व. के.एम. पाटील यांच्या सारख्या दिग्गज मंडळींना पक्षाने विविध पदांवर संधी दिली. याचे कारण म्हणजे त्यांनी त्यावेळी पक्षासाठी मोठे योगदान देऊन पक्ष वाढविला, मतदार संघ राखले. आज मात्र ते वैभव गायब झाल्याचीच प्रचिती येत आहे. नुकत्याच काही पालिका व जळगाव महापालिकेची निवडणूक झाली. जामनेर पालिका, मुक्ताईनगर पालिका व त्यानंतर जळगाव महापालिकेची निवडणूक झाली. या तिनही ठिकाणी कॉँग्रेसचे पानिपत झाले. एकाही जागेवर या पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकले नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही जळगावला भेट देऊन गट, तट विसरा पक्ष वाढवा असा उपदेश केला. पक्षाचे प्रभारी म्हणून जबाबदारी असलेले विनायक देशमुख यांनीही अखेर हात टेकले व जळगाव जिल्ह्याची जबाबदारी नको रे बाबा...अशी भूमिका घेतली. असे असताना या जिल्ह्यात पक्ष पुन्हा उभा राहील अशी आशा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना आजही आहे. त्यांनी ही आशा शहरातील बुद्धीजिवींशी संवाद साधताना व्यक्तही केली. पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ त्यांनी जळगाव जिल्ह्यातून केला. जनसंघर्षाची ‘ज्योत’ त्यांनी या जिल्ह्यातून प्रज्वालीत केली. आता जबाबदारी या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आहे. आजही या पक्षात गट-तट हे आहेच हे नाकारून चालणार नाही. त्यातूनच मोठी मर्गल निर्माण झाली आहे. पेटविलेल्या ज्योतीचा वणवा केला नाही तर... पूर्वी होती तीच स्थिती पक्षाची राहील.

 

Web Title: Will the Congress get a turnaround?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.