लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डिसेंबर २०१९ पासून रखडलेल्या जिल्ह्यातील १११८ सहकारी संस्थाच्या निवडणुकांचा बिगुल आता लवकरच वाजण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेमुळे ऑगस्ट २०२१ पर्यंत या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, आता कोरोनावर काहीअंशी नियंत्रण आले असल्याने याबाबत पुढील काही दिवसात शासनाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मार्च ते डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका गेल्या दीड वर्षांपासून थांबल्या आहेत. यामध्ये विकास सोसायट्यांचा निवडणुकांपासून ते जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था असलेल्या ग.स.सोसायटीचाही समावेश आहे. यासह जिल्हा बँक, जिल्हा दुध संघ, मराठा विद्या प्रसारक मंडळासह जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचीही मुदत संपली आहे.
शासनाने आतापर्यंत काढले सहा आदेश
१) कोरोनामुळे या काळात मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थाच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. याबाबत एप्रिल २०२० मध्ये शासनाने आदेश काढले. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये पुन्हा आदेश काढून काही सहकारी संस्थाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाला मुदतवाढ देखील देण्यात आली. काही निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली.
२) त्यानंतर १६ जानेवारी २०२१ रोजी शासनाने काढलेल्या निर्णयात या निवडणुका ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, २ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयात आता १६ जानेवारीचा निर्णय रद्द करून, या थांबलेल्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले. पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे या निवडणुकांना ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, आता कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण आले असल्याने या निवडणुका घेण्याची तयारी सहकार व पणन विभागाकडून सुरु आहे.
सहा टप्प्यात घेण्यात येतील निवडणुका
सर्व निवडणुका आता मुदत संपलेल्या कार्यकाळानुसार घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कोवीड १९ च्या प्रादुर्भावामुळे थांबलेल्या ८३ सहकारी संस्थाच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१९ रोजी मुदत संपलेल्या २०४ संस्थाच्या, तिसऱ्या टप्प्यात ३१ मार्च २०२० रोजी मुदत संपलेल्या ६०९ संस्थाच्या, चौथ्या टप्प्यात ३० जून २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ८० संस्थाच्या तर पाचव्या टप्प्यात ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्य ९० व शेवटच्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ५२ अशा एकूण १११८ सहकारी संस्थाच्या निवडणुका या पार पडणार आहेत.
ग.स.साठी तयारी सुरु ; जिल्हा बँकेसाठी मात्र घोषणेची प्रतीक्षा
ग.स.सोसायटीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. सहकार गटाकडून बैठकींचे सत्र सुरु झाले आहे. तर लोकसहकार, लोकमान्य, लोकशाही गटाकडून देखील बैठका सुरु आहेत. दरम्यान, जिल्हा बँकेसाठी मध्यंतरी तीव्र हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र, निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर सर्व राजकीय हालचाली थांबल्या होत्या. अजूनही जिल्हा बँकेसाठी जिल्ह्यात कोणत्याही हालचाली सुरु नसून, अजून निवडणुकांची घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.