लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वॉटरग्रेस कंपनीचे संचालक चेतन वोरा यांनी सुनील झंवर यांच्या साई मार्केटींग कंपनीसोबत करार करून त्यांना उपठेका दिल्याचा चर्चा सुरु असून, याबाबत मनपाने वॉटरग्रेस कंपनीला नोटीस पाठविल्यानंतर मंगळवारी वॉटरग्रेस कंपनीने मनपाकडे आपला खुलासा सादर केला आहे. तसेच कोणत्याही अन्य कंपनीला उपठेका दिला नसल्याचे वॉटरग्रेस कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, याबाबत मनपा प्रशासनाने कायदेशिर बाबी तपासण्याची तयारी सुरु केली आहे. गरज पडल्यास युनियन बँकेकडूनही माहिती मागण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.
सुनील झंवर यांचे वॉटरग्रेस सोबत कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. वॉटरग्रेस कंपनीने झंवर यांच्या साई मार्केटींग या कंपनीला उपठेका दिला असल्याचीही चर्चा आहे. याबाबतचे कागदपत्रे झंवर यांच्या कार्यालयातून जप्त करण्यात आले आहेत. यासह काही सफाई कर्मचाऱ्यांचे एटीएम कार्ड देखील याठिकाणी आढळून आले होते. त्यादृष्टीने मनपाने चौकशी सुरु केली आहे. झंवर व वॉटरग्रेसमध्ये काही करार झाला आहे का नाही ? याबाबत मनपाने वॉटरग्रेस कंपनीच्या संचालकांना नोटीस बजावली होती. तसेच युनियन बँकेकडे देखील आता मनपा आता माहिती मागण्याचा तयारीत आहे.
कोणताही उपठेका नाही, झंवर यांच्या कार्यालयातच वाॅटरग्रेसचे कार्यालय
वॉटरग्रेस कंपनीने मंगळवारी मनपाकडे आपला खुलासा सादर केला आहे. वॉटरग्रेस कंपनीने कोणताही करार इतर ठेकेदारासोबत केला नाही. वॉटरग्रेस कंपनीने काही कर्मचाऱ्यांची नेमणूक कामकाज पाहण्यासाठी केली असल्याचे म्हटले आहे. तसेच सर्व आरोप व चर्चा निराधार असल्याचाही खुलासा वॉटरग्रेस कंपनीने मनपाकडे सादर केलेल्या खुलाशात म्हटले आहे. दरम्यान, सुनील झंवर यांच्या कार्यालय परिसरात वॉटरग्रेसचे कार्यालय असल्याची माहिती वॉटरग्रेसचे संचालक चेतन वोरा यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र,उपठेक्याचा कोणताही विषय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.