लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसपक्ष जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढत आहे, मात्र, त्यात पक्षाला यश येत नसून आता आगामी काळात संघटनात्मक बदलाच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींनी टाकलेली पावले बघता या दृष्टीने जिल्ह्यात नवीन नेतृत्वाची चर्चा शिवाय चाचपणीही वरिष्ठ पातळीवरून सुरू झाली आहे. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा आता बदलाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा मानला जात असून त्याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांच्या तुलनेत अद्यापही काँग्रेस पक्ष अगदी लोकसभेपासून तर थेट ग्रामपंचायतीपर्यंत जिल्ह्यात पिछाडीवरच आहे. कमी अधिक प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसच्या जागा असतीलही मात्र, पूर्वीची काँग्रेस आता जिल्ह्यात नाहीच, असा एक सूर उमटत आहे. एकाच विषयावरून प्रत्येक आघाडीचे वेगेवेगळी आंदोलने होतात. आंदेालनाला पुरेसे कार्यकर्ते नसताता, असे उदासीन चित्र काँग्रेसमध्ये आताही कायम आहे. दुसरीकडे अगदी बुथप्रमुख ते पन्नाप्रमुख असे काही पक्षांचे नियोजन असताना काँग्रेसकडे पुरेशी संघटनाच नसल्याची जिल्ह्यात स्थिती आहे.
जिल्ह्यातील संघटनेत बदलाच्या चर्चा
मुंबईत एक मोठी बैठक पार पडल्यानंतर आता काँग्रेसमध्ये बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, जे काही संघटनात्मक बदल होतील ते खरच काँग्रेसला नवसंजीवनी देतील का? असाही एक प्रश्न समोर येत आहे. काँग्रेसमध्येही गटा- तटाचे राजकारण आहेच, त्यामुळे पक्ष वाढला नाही, असेही काही पदाधिकारी सांगातात. जिल्हाध्यक्षपदासाठी जी नावे चर्चेत येत आहेत ते पदाधिकारी वर्षानुवर्षे पक्षाची जुळलेले असून त्यांनी प्रदेशवरही काम केले आहे. त्यामुळे यातून योग्य नेतृत्व निवडणे हे वरिष्ठांसमोर एक आव्हान राहणार आहे. मुंबईच्या बैठकीची विशेष बाब म्हणजे पक्षश्रेष्ठींनी प्रथमच एकत्रित पदाधिकाऱ्यांना वेळ दिला आहे. त्यामुळे जळगावात काँग्रेसवाढीसाठी वरिष्ठ पातळीवरूनच हालचाली गतीमान झाल्या आहेत.
२३ रोजी नाना पटोले जिल्ह्यात ?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे २३ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता असून याबाबतचा दौरा अधिकृत आलेला नसला तरी काही कार्यक्रमांचे नियोजन झाल्याचे सूत्रांकडून समजते. फैजपूर येथे ते रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील तर अमळनेर येथे ते जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दौऱ्यावर जिल्हा काँग्रेसचे पुढील भवितव्य अवलंबून असल्याने या दौऱ्याकडे बघितले जात आहे.