स्वतंत्र भारतात विविध आर्थिक, सामाजिक स्तरावर जगणाऱ्या अठरापगड जाती जमातींना कधीतरी समतेच्या एका पातळीवर आणू या उद्देशाने राखीव जागा हा उपाय केला आहे. पण जातीय अहंकार आणि धनिकांचे वर्चस्व सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ देईल का ? हा प्रश्न डॉ. पायल तडवीच्या मृत्यूने ऐरणीवर आला आहे. विद्यार्थी असताना आम्ही ‘एकलव्योंके अंगुठे कब तक कटते रहेंगे’ नावाचे प्रदर्शन तयार करून शिक्षण व्यवस्थेपासून उपेक्षित राहिलेल्या घटकांची समस्या मांडत होतो. आज डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येमुळे त्याची आठवण झाली. तडवी हा आदिवासी समाज जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल परिसरात आहे. या व्यतिरिक्त फारसा कुठे नाही. आदिवासींसाठी प्रयत्न पूर्वक केलेल्या शैक्षणिक सुविधांचा परिणाम म्हणजे त्यांच्यातील साधारणपणे दुसºया पिढीने उच्च शिक्षणात पाय रोवला आहे. डॉ. पायलचे आई वडील हे पदवीधर होऊन जिल्हा परिषदेच्या सेवेत आहेत. सुशिक्षित कुटुंबातील पायल बारावी पासून सलगपणे चांगले गुण मिळवून वैद्यकीय शिक्षण घेऊन एमबीबीएस झाली आणि पुढे पदव्युत्तर अभ्यासक्रमात तिने प्रवेश मिळवला. पण आदिवासी भिल्ल तडवी सारख्या अति मागास जमातीतून आलेली मुलगी तिच्या सहपाठींच्या मनात खुपत होती. समाजात अत्यंत प्रतिष्ठेचा व्यवसाय, त्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ ही जास्त पसंती असलेली शाखा. त्या शाखेची एमडी होणारी डॉ पायल. तिच्यासोबत शिकणाºया तीन वरिष्ठ (सिनियर) डॉक्टर महिलांनी तिचे मनोधैर्य, एकाग्रता भंग करण्यासाठी मानसिक छळ केला. तिला अधिक सराव, कौशल्य मिळू नये यासाठी पक्षपात करणे, तुच्छ लेखणे, वरिष्ठांकडे तक्रारींच्या धमक्या देणे अशा अनेक प्रकारे रॅगिंग करून विद्यार्थी म्हणून जगणे कठीण केले. अखेर २२ मे रोजी तिने आपले आयुष्य संपविले. तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली ही शंका पालकांच्या मनात आहे. प्रमुख आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल फरार आहेत. नायर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची निष्क्रियता न्यायाचे आश्वासन देत नाहीये. त्यामुळे जातीय अहंकार आणि धनिकांचे वर्चस्व सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ देतील का, अजून किती एकलव्यांचा तेजोभंग ही व्यवस्था करणार आहे?, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.- वासंती दिघे, जळगाव.
धनिकांचे वर्चस्व सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ देईल का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:52 PM