लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची रुग्णवाढ मोठ्या प्रमाणावर समोर आल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मागणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वाढली आहे. दिवसाला ४०० सिलिंडर लागत असल्याची माहिती आहे. दरम्यान, अशातच ऑक्सिजन टँक मंगळवारी कार्यान्वयित होण्याची चिन्हे आहेत. लिक्विड प्राप्त होताच हा टँक सुरू होणार आहे.
ऑक्सिजन टँकला नुकतीच पेसेाची मान्यता मिळाली आहे. या टँकच ट्रायलही घेण्यात आली आहे. मुंबई येथून लिक्विड आणले जाणार असून ते मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर टँक कार्यान्वयित होणार आहे. एका वेळी टँक भरल्यानंतर पाच ते सहा दिवसांचा ऑक्सिजनसाठा निर्मित होणार आहे. त्यानुसार साधारण २१ जम्बो सिलिंडर ऑक्सिजन यातून उपलब्ध होणार आहे. आताच्या गरजेनुसार किमान आठ दिवस हा पुरवठा चालू शकेल. त्यानंतर पुन्हा लिक्विडने टँक भरावी लागणार आहे. रोज वाहनांची वाट बघणे, मनुष्यबळ त्यासाठी लावणे, अतिरिक्त वाहन खर्च या बाबींपासून प्रशासनाची सुटका होणार आहे.
चारशे सिलिंडर प्रतिदिन
गेल्या महिनाभरापूर्वी साधारण शंभर ते दीडशे सिलिंडर ऐवढे ऑक्सिजन लागत होते. हीच मागणी आता वाढून चारशे सिलिंडरपर्यंत गेली आहे. रुग्णवाढ समोर आल्याने ही मागणी वाढली आहे. त्यातच आता ७ ते ९ क्रमांकांच्या कक्षांमध्ये कोविड रुग्णांना दाखल करण्यात येणार असल्याने सिलिंडरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.