जळगाव : आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनने नुकतीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. अधिवेशनानंतर या प्रश्नांबाबत तातडीने लक्ष घालून ते सोडविण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन यावेळी पालकमंत्री पाटील यांनी दिले.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या जि. प.च्या स्वच्छता अभियानात वैयक्तिक शौचालय बांधकामावरून अनेक जिल्ह्यातील ग्रामसेवकांवर चुकीच्या प्रशासकीय कारवाया झाल्या आहेत, यावर पुनर्विचार करण्याची मागणी युनियनतर्फे करण्यात आली. यावर राज्य युनियन शिष्टमंडळाने मुंबईला मंत्रालयात यावे, सविस्तर चर्चा करून फेरविचार करू, असे आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यावेळी ग्रामसेवक युनियनचे राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम,जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, कायदे सल्लागार रमेश पवार, धरणगाव तालुका सचिव पंजाबराव आप्पासाहेब, ग्रामसेवक पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन नवल पाटील, राकेश कोतकर उपस्थित होते.