लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सार्वजनिक आरेाग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या मे महिन्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन याची तुलनात्मक आकडेवारी जाहीर केली आहे. यात रुग्णवाढीचा दर, आठवड्याची पॉझिटिव्हिटी या दोन्ही पातळ्यांवर जळगाव जिल्ह्याची कामगिरी सरस आहे. हे प्रमाण राज्याच्या तुलनेत कितीतरी कमी असून, दुसरीकडे रिकव्हरी रेट हा राज्यापेक्षा अधिक आहे. असे चित्र असल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने आता १ तारखेनंतर जिल्ह्याचे निर्बंध शिथिल होतील का आणि ते किती प्रमाणात होतील, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
दोन महिन्यांपूर्वी अगदी सक्रिय रुग्णांमध्ये देशातील पहिल्या दहामध्ये ८ व्या क्रमांकांवर असलेल्या जळगाव जिल्ह्याला एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून दिलासा मिळत गेला. मेच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने खाली गेला. आरटीपीसीआर चाचण्यांची दैनंदिन पॉझिटिव्हिटी ही दीड टक्क्यांवर पोहोचली. तर आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवूनही त्यात बाधित येणाऱ्यांची संख्या घटली. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विविध पातळ्यांवर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.
चाचण्यांचे प्रमाण कमी
प्रति दक्षलक्ष लोकसंख्येमागे राज्यात एकूण २ लाख ६१ हजार ४६० कोरोना चाचण्या झालेल्या आहेत. त्या तुलनेत जळगावात प्रतिदशलक्ष लोकसंख्ये मागे २ लाख १९ हजार ७५१ चाचण्या झालेल्या आहेत. या बाबतीत जिल्ह्याचा राज्यात ११ वा क्रमांक लागतो. राज्याच्या चाचण्यांपेक्षा जिल्ह्यात ४१ हजार ७०९ चाचण्या कमी आहेत.
राज्याची स्थिती
पॉझिटिव्हिटी : १०.४६ टक्के
रुग्णवाढीचा दर : ०.४७ टक्के
राज्याचा रिकव्हरी रेट : ९२.७६ टक्के
याबाबतीत जिल्हा सरस
पॉझिटिव्हिटी : ३.४१ टक्के, राज्यात सर्वाधिक कमी
रुग्णवाढीचा दर : ०.२६ टक्के राज्यात २८ व्या क्रमांकावर
रिकव्हरी रेट : ९३.५० टक्के, राज्यापेक्षा एक टक्क्यांनी अधिक
सक्रिय रुग्ण : सक्रिय रुग्णांच्या बाबतीत राज्यात पहिल्या दहा जिल्ह्यांपेक्षा ७ हजाराने जळगावात सक्रिय रुग्ण कमी आहेत.
यात जिल्ह्यात सुधारणा हव्यात
राज्याचा एकत्रित मृत्यूदर हा जिल्ह्याच्या मृत्यूदरापेक्षा कमी आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर हा १.८१ टक्के असून, राज्याचा मृत्यूदर हा १.६२ टक्के आहे. मे महिन्याचा विचार केल्यास राज्याचा मृत्यूदर हा १.७६ टक्के आहे. यासह चाचण्या राज्यापेक्षा कमी असून, या दोन बाबतीत जिल्ह्याला सुधारणा करण्याची गरज आहे.
२२ टक्के टार्गेट पूर्ण
लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे २२ टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. यात जिल्हा राज्यात १९ व्या क्रमांकावर असून, यात धुळ्याची लोकसंख्या कमी असल्याने त्या ठिकाणी कमी लसीकरण झालेले असतानाही त्या ठिकाणी २५ टक्के टार्गेट पूर्ण झाले आहे. जिल्हाभरात आतापर्यंत ३ लाख १९ हजार २६४ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे.