अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरु आहे. मात्र, केवळ ४०० मीटरच्या या पुलाच्या कामाला प्रशासकीय अडचणी, पाठपुराव्याचा अभाव, कोरोना, लॉकडाऊन, नागरिकांचा विरोध अशा अनेक विघ्नांना सामोरे जावे लागत आहे. २२ महिने या पुलाच्या कामाला मुदत देण्यात आली होती. मात्र, २२ महिने होवून देखील पुलाचे काम ५० टक्केच पूर्ण झाले असून, विद्युत खांब हटविल्याशिवाय हे काम पूर्ण होणे कठीण आहे. अशा परिस्थितीत पुलाचे काम आता केव्हा होईल ? याबाबत प्रशासकीय यंत्रणेतील व पदाधिकारी देखील ठामपणे सांगू शकत नाहीत.
जुन्या पुलाचे काम -१९०८
पुलाची मुदत संपली - २००८
नवीन शिवाजीनगर उड्डाणपूलाला मंजूरी - २०१६
निविदा - २०१७
कार्यादेश - सप्टेंबर २०१८
कामाला सुरुवात - २५ फेब्रुवारी २०१९
कामाची मुदत संपली - १२ फेब्रुवारी २०२१
मुदतवाढ - ३० ऑगस्ट २०२१
विघ्नांची परंपरा
१. इंग्रजांनी १९०८ मध्ये हा पुल बांधला होता. मुदत संपल्यानंतर पूल पाडण्यात यावा याबाबत २००८ मध्येच आले होते पत्र.
२. १०० वर्ष जुन्या पुलाची मुदत संपल्यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर पुलाच्या कामाला मिळाली मंजूरी.
३. काम कोण करेल, मनपा, रेल्वे की सार्वजनिक बांधकाम विभाग ? यावरच अनेक महिने झाले खर्च
४. रेल्वेने आपल्या भागातील कामाची दाखवली तयारी, मात्र, निधी नसल्याचे कारण देत मनपाने झटकले हात.
५. राज्य शासनाने निधी मंजूर करून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केले वर्ग.
६. पुलाचे काम मंजूर झाल्यानंतर पूल ‘टी’ आकारात होईल ‘वाय’, की मग ‘एल‘, यावर तब्बल सहा महिने निर्णय रखडला.
७. २५ फेब्रुवारी २०१९ ला कामाला ‘टी’ आकारानुसार कामाला सुरुवात.
८.पुलाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांब हटविण्याचे काम झाले नसल्याने, पुलाच्या कामावर परिणाम
९. रेल्वेने ६ महिन्यातच आपल्या हद्दीतील काम संपविले.
१०. कोरोनामुळे लॉकडाऊन, कामावरील मजूर परतले, पुलाचे काम पुन्हा थांबले.
११. पुलाचे ५० टक्के काम पुर्ण, मात्र विद्युत खांब न हटविल्याने काम रखडले
प्रशासकीय यंत्रणेत जाणवली अनास्था
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या संपुर्ण प्रक्रियेत प्रशासनाची मोठ्या प्रमाणात उदासिनता दिसून आली. पुलाची मुदत संपल्यापासून ते निधी मंजूरी, निविदा, कार्यादेश, पुलाचा आकार, विद्युत खांब हटविण्याचा कामासह मनपा, महावितरण, रेल्वे, विभागीय आयुक्त कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग असो वा जिल्हा प्रशासन या सर्व प्रशासकीय यंत्रणाचा ढिसाळपणा व उदासीनतेमुळे ४०० मीटर पुलाचे काम तब्बल अडीच वर्ष होवून देखील अद्यापपर्यंत पूर्ण होवू शकलेले नाही.
पाठपुराव्याचा अभाव
१. पुलाचे काम मंजूर झाल्यापासून जिल्ह्याला ६ पालकमंत्री लाभले, ४०० मीटर पुलाचे काम पूर्ण करू शकले नाहीत.
२. शिवाजीनगर भागातील १२ नगरसेवक मनपात या भागातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात, प्रश्न मांडण्यात ठरले अपयशी.
३. शहराचे आमदार सुरेश भोळे हे २०१४ ते २०१९ पर्यंत सत्ताधारी पक्षाचे आमदार होते. मात्र,पुलाच्या कामासाठी पाठपुरावा करण्यात ठरले अपयशी.
४. पुलाच्या मंजुरीपासून ते आतापर्यंत मनपाचे पाच महापौर बदलले, मात्र पुलाचे काम झालेच नाही.
५. मनपाचे पाच आयुक्त, ५ जिल्हाधिकारी आले आणि गेले, पाच वर्षात पुलाचे काम अधांतरीतच.
५ लाख नागरिकांना बसतोय फटका
१. शिवाजीनगर, राजाराम नगर, केसी पार्क, दांडेकर, प्रजापत नगर, पवन नगर, गेंदालाल मील, लाकूड पेठ, इंद्रप्रस्थ नगर भागातील सुमारे ५० हजारहून अधिक नागरिक दररोज करतात येजा,
२. जळगाव तालुक्यातील २५ गावांमधील नागरिकांना शहरात येण्यासाठीचा मार्ग अडीच वर्षांपासून आहे बंद.
३. चोपडा व यावल तालुक्यांमध्ये दररोजच्या ३ बस फेऱ्या प्रभावित, खासगी वाहनांची संख्याही अमर्यादित आहे.
४. जळगाव शहर, तालुक्यातील २५ गावांसह चोपडा, यावल तालुक्यासह सुमारे ५ लाख नागरिकांना पुलाचे काम रखडल्याने बसतोय फटका.
पुलाचे काम केव्हा पुर्ण होईल ? याबाबतचा प्रश्न प्रमुख अधिकारी, आमदार, महापौरांना विचारला असता त्यांनी दिलेले उत्तर..
- सुरेश भोळे (आमदार) - या पुलाच्या कामात प्रशासकीय यंत्रणेची टोलवा-टोलवी सुरु असून, यामुळे पुलाचे काम रखडत जात आहे.
-जयश्री महाजन (महापौर) -पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरु आहे. मनपाचा त्यात आता सहभाग नाही. पुलाचे काम केव्हा होईल ? याबाबत बांधकाम विभागच सांगू शकेल.
- प्रशांत सोनवणे ( अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग) - विद्युत खांब हटविले तर तीनच महिन्यात या पुलाचे काम पुर्ण होवू शकते. विद्युत खांब जोपर्यंत हटणार नाही. तोपर्यंत काम होवू शकत नाही.
- फारूक शेख (अधीक्षक अभियंता, महावितरण) - जिल्हा प्रशासनाकडून निधी मिळाल्यावर विद्युत खांब हटविण्याचे काम पुर्ण करु.
- आदित्य खटोड ( मक्तेदार) - पुलाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. अन्य अडचणी न आल्यास डिसेंबरपर्यंत काम पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे.