चाळीसगाव : शिक्षक हा विकासाचा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासंदर्भात सातत्याने सकारात्मक भूमिका राज्य शासन घेत असून यापुढेही घेईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन दिली.राज्यातील ३८ शिक्षक संघटनांच्या राज्य अध्यक्षांच्या राज्य समन्वय समितीसोबत मंत्रालयात त्यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्य समन्वय समितीची वतीने राज्यातील शिक्षक , केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक, राज्य शासन आदर्श शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे २४ प्रश्नांवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्यासोबत ही बैठक आयोजित केली होती. परंतु ते परदेशात गेले असल्यामुळे स्वत: गिरीश महाजन यांनी सर्व प्रश्न त्समजून घेऊन लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन राज्य समन्वय समितीला दिले व मंत्री आशिष शेलार यांच्याशीही याबाबत दूरध्वनीवर संपर्क साधला. राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर (चाळीसगाव ) यांना लवकरच पुन्हा बैठक बोलविली जाईल, असे सांगण्यात आले. राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एसटी प्रवास सवलत मोफत करण्याच्या मागणीचाही यावेळी विचार झाला. महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने यावेळी निवेदन दिले . शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष ईला हजूउद्दीन फारुक, राज्य समन्वय समितीचे सचिव बाबुराव पवार, राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुण जाधव ,अच्चीत साबळे, परमेश्वर सावळे, पांडुरंग काकतकर, पुष्पलता मुळे, जतीन कदम, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष एम. ए. गफ्फार (नांदेड), किशोर पाटील ढोमणेकर (चाळीसगाव) , महिला पदवीधर संघाच्या कार्याध्यक्ष मीना पगारे, राम सुतार, ओमप्रकाश थेटे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
शिक्षकांचे प्रश्न सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 4:53 PM