लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्या ५३३ रुग्णांपैकी ८८ रुग्णांनी म्हणजे १६.५१ टक्के रुग्णांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल होण्याच्या ६ ते २४ तासांच्या आत झालेला आहे. सुरुवातीच्या काळात रुग्णालयात उशिरा दाखल होणे, हे यामागील मुख्य कारण सांगितले जात आहे.
जिल्हाभरात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण हे सप्टेंबर महिन्यापर्यंत अतिशय गंभीर स्थितीत होते. त्यानंतर स्थानिक पातळीवर योग्य वैद्यकीय सुविधा सुरू झाल्यानंतर ही संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. अनेक दूरच्या गंभीर रुग्णांना थेट जळगावलाच दाखल करण्याशिवाय मध्यंतरी पर्याय नव्हता, त्यामुळे उशिरा रुग्णालयात येणाऱ्या व त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण हे अधिक आहे. सप्टेंबरनंतर कोविड रुग्णालयातील होणारे मृत्यू थांबले असून, आता दिवसाला सरासरी एक मृत्यूची नोंद होत आहे. बऱ्याच रुग्णांचा मृत्यू हा रुग्णालयात पंधरा दिवस राहिल्यानंतरही झाला आहे. पारोळ्याच्या एका महिलेचा पंधरा दिवसांनंतर अहवाल निगेटिव्ह आलेला होता. मात्र, ऑक्सिजनची पातळी कमी असल्याने अखेर या महिलेचा सोळाव्या दिवशी मृत्यू झाला होता.
असे आहेत मृत्यू
मृतावस्थेत ९
६ तासांच्या आधी ३९
६ ते २४ तासांच्या आत ८८
२४ ते ७२ तासांच्या आत १४९
७२ तासांपेक्षा अधिक कालावधीत २४९
तज्ज्ञ सांगतात ही पाच कारणे
१ रुग्णाला क्षयरोग असणे
२ रुग्णाला आधीच पक्षाघात असणे
३ तीव्र अस्थमा असणे
४ रुग्ण हिमोडायलिसिसवर असणे
५ अत्यंत गंभीरावस्थेत रुग्ण दाखल होणे
अशी विविध कारणे २४ तासांच्या आत मृत्यूला कारणीभूत असू शकतात, असे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
महिलांपेक्षा पुरुषांना मृत्यूचा अधिक धोका
मृतांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे या मृत्यूंच्या विश्लेषणाने समोर आले आहे. या ५३३ मृत्यूंपैकी ३५४ पुरुष तर १७९ महिलांचा समावेश आहे. तज्ज्ञांकडून जाणून घेतले असता, पुरुष वातावरणात एक्सपोज होतात, म्हणजेच त्यांचा महिलांपेक्षा बाहेरच्या वातावरणाशी, गर्दीशी अधिकचा संबंध येत असतो. शिवाय धूम्रपान, मद्यपान याचे प्रमाणही पुरुषांमध्ये अधिक असते. त्यामुळे त्यांची प्रतिकारक्षमता कमी होते. त्यामुळे महिलांपेक्षा पुरुषांचे मृतांमध्ये प्रमाण अधिक असल्याची ही कारणे असू शकतात, अशी माहिती औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी दिली.