जळगाव : एमआयडीसीतील मानराज मोटर्स या वाहनाच्या शोरुममध्ये अवघ्या १६ मिनिटात चोरट्यांनी टॅमीने कांउटर फोडून चार लाखाची रोकड व मोबाईल लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. तोंडाला रुमाल बांधलेले दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शोरुमधील वर्कशॉप मॅनेजर दिनेश भगीरथ पाटील (४२, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी पहाटे २.१० वाजता तोंडाला रुमाल बांधलेले तसेच निळ्या रंगाची जिन्स व स्वेटर परिधान केलेले दोन चोरटे काचेचा दरवाजा उघडून शोरुममध्ये आले. एकाने टॅमीने कॅशियर कांउटर तोडले. त्यातील ३ लाख ९९ हजार ३८५ रुपये रोख व शेजारच्या कांउटरमधील अडीच हजाराचा मोबाईल काढला, त्यानंतर २.२६ मिनिटांनी दोघं जण बाहेर पडले.सुरक्षा रक्षक असताना झाली चोरीया शोरुममध्ये प्रवेशद्वाराजवळच सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे, असे असतानाही चोरीचा प्रकार घडला आहे. शोरुमला काचेचे दरवाजे आहेत, मात्र त्याचे लॉक खराब झाले असल्याने ते उघडेच असतात. त्याचाही फटका या ठिकाणी बसला आहे.मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजता अमोल लोहार हा कर्मचारी कामावर आला असता त्याला कांउटर तुटलेले दिसले. महाव्यवस्थापक प्रशांत सोनवणे यांच्या सूचनेवरुन पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली.सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, निरीक्षक रणजीत शिरसाठ, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, हेमंत कळसकर, इम्रान सय्यद यांनी घटनास्थळाची पाहणी करुन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
१६ मिनिटात काऊंटर फोडून ४ लाख लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:16 PM