लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नॅक पुनर्मूल्यांकनासाठीची तयारी सुरू केली आहे. स्वयंअध्ययन अहवालाची ८० टक्के कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे पूर्ण होताच, आगामी काही दिवसांत अहवाल नॅककडे पाठविण्यात येणार आहे. नंतर नॅकच्या चमूकडून विद्यापीठाची पाहणी केली जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुनर्मूल्यांकनासाठी नॅककडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यापीठाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वयंअध्ययन अहवाल देखील लवकरच पूर्ण होणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्यामुळे उर्वरित माहिती गोळा करण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपताच उर्वरित २० टक्के कामे पूर्ण करून अहवाल हा दोन महिन्यांच्या आत नॅककडे सादर केला जाणार आहे. प्रस्ताव सादर केल्याच्या तीन महिन्यांनंतर नॅकच्या चमूकडून विद्यापीठाची पाहणी केली जाईल. ही पाहणी दिवाळीच्या काळात होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया रखडली असून, परिस्थिती नियंत्रण आल्यानंतर पुन्हा माहिती अहवाल पूर्ण करण्याच्या कामास सुरुवात होणार आहे.