जळगाव, दि.13- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, शिक्षणशास्त्र, समाजकार्य महाविद्यालय अशा 98 महाविद्यालयापैकी 45 महाविद्यालयांचा कार्यभार सध्या प्रभारी प्राचार्यावरच दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून अद्यापर्पयत नवीन प्राचार्याची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे उमवि व उच्चशिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षात रिक्त असलेल्या प्राचार्याची भरती करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात उमविच्या अंतर्गत विविध अभ्यासक्रमाचे 103 महाविद्यालये आहेत. महाविद्यालय व संस्थाचालक यांच्यातील महत्वाचा दुवा प्राचार्य असताना काही महाविद्यालयांमध्ये प्रभारी प्राचार्यावरच सध्या काम सोपविण्यात आले आहे. रिक्त असलेल्या महाविद्यालयांमध्ये 81 अनुदानित महाविद्यालये ही उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येतात. त्यापैकी 41 प्राचार्याचा जागा या रिक्त आहेत. यासह 12 अभियांत्रिकी महाविद्यालयापैकी 4 महाविद्यालयांमध्ये प्रभारी प्राचार्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनेक महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभरापासून प्राचार्याची पदे रिक्त असल्याचे समोर आहे. 2015-16 मध्ये 16 प्राचार्याची पदे रिक्त होती. त्यानंतर 2016-17 मध्ये हीच संख्या 41 वर आली आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील मान्यताप्राप्त परिसंस्था असलेल्या 19 संशोधन संस्थाच्या 15 संचालकांचे पदे अद्यापर्पयत उमवि प्रशासनाकडून भरण्यात आलेली नाही. एक-एक वर्ष प्राचार्य निवडीची प्रक्रिया होतच नसल्याने दिरंगाई किती दिवस राहील, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
रिक्त प्राचार्याची संख्या
(कंसात महाविद्यालयांची संख्या)
कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय 24 (51 ), ललित कला महाविद्यालय 2 (3), समाजकार्य महाविद्यालय 2 (3), विधी महाविद्यालय 1 (3), शिक्षणशास्त्र महाविद्यालय 10 (22) अभियांत्रिकी महाविद्यालये 4 (12).
सध्या प्राचार्य नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. ज्या महाविद्यालयामध्ये प्राचार्याची पदे रिक्त आहेत. अशा महाविद्यालयांमधील प्राचार्याच्या जागा पुढील शैक्षणिक वर्षात भरली जातील.
-डॉ.केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग,