पाचोरा - भाजपाच्या तालुका तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यांसह जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाचोरा शिवसेनेच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींविरोधात खोट्या तक्रारी दाखल करून अन्याय केला व द्वेषभावना ठेऊन राजकारण केले. त्यामुळे जिल्हा भाजपाने खुलासा करून या सर्वांचे निराकरण केल्याशिवाय पाचोरा शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भाजपाचा प्रचार करणार नाही, असा निर्धार पाचोरा-भडगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे, अशी माहिती शिवसेनेचे अॅड दिनकर देवरे यांनी शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे या वेळी आमदार किशोर पाटील हेदेखील उपस्थित होते.पत्रकार परिषदेस आमदार किशोर पाटील यांच्यासह उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, गणेश परदेशी, जि.प. सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, दीपक राजपूत, संजय पाटील, पाचोरा तालुका प्रमुख शरद पाटील, भडगावचे जे.के. पाटील, पाचोरा नगराध्यक्ष संजय गोहिल, भडगाव नगराध्यक्ष अतुल पाटील, मनोहर चौधरी, उपनगराध्यक्ष शरद पाटे, बंडू चौधरी, हिलाल पाटील, अरुण पाटील, सतीश चेडे, दत्ता जडे, डॉ. प्रमोद पाटील, युवराज पाटील, जगू भोई, श्याम पाटील, अविनाश कुडे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी अॅड देवरे म्हणाले की, भाजपाने कायद्याचा गैरवापर व सत्तेचा दुरुपयोग करून पाचोरा बाजार समितीत शिवसेनेच्या ७ संचालकांना अपात्र केले व तेथे राष्ट्रवादीशी युती केली. जिल्हा परिषदेत काँग्रेसशी युती करून शिवसेनेच्या सदस्यांना सत्तेपासून दूर ठेवले तसेच पं.स. सभापतींनी शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधीवर खोटे गुन्हे दाखल करून दिवाळी सणाच्या आनंदा पासून वंचीत ठेऊन तुरुंगामध्ये टाकले. पं.समितीमध्ये काँग्रेसशी युती करीत सत्ता मिळविली. अशा अनेक कारणांनी शिवसैनिक व्यथित झाले असल्याने भाजपाचा प्रचार कसा करायचा ? असा प्रश्न उपस्थित होत असून आम्ही युतीधर्म पाळू, मात्र भाजपाच्या जिल्हा नेतृत्वाने तालुका भाजपा पदाधिकारी व गिरीश महाजन यांना पाचोरा येथेच बैठक घेऊन निराकरण केल्याशिवाय प्रचार करणार नाही, असा निर्धार केला.पक्षादेशाप्रमाणे प्रचार करणार - आमदार किशोर पाटीलयावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, पक्षादेशाप्रमाणे मी प्रचार करणार असून हा पाचोरा शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधींचा निर्णय आहे, तो भाजपाने सोडवावा असे मत व्यक्त केले.
आरोपांचे निराकरण केल्याशिवाय भाजपाचा प्रचार करणार नाही- पाचोरा येथे शिवसेनेचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:50 PM