जळगाव: शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट केल्याशिवाय संच मान्यता होणार तर नाहीच पण त्या अभावी शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी हे काम पूर्ण करून घेण्यासाठी शाळांची धावाधाव सुरू आहे. काही शाळांनी स्वखर्चाने कॅम्प लावून विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड करून घेतले आहेत.
राज्य शासनाने २०, ४० व ६० टक्के अनुदान व टप्पा वाढ देण्याचा निर्णय घेताना आधार आधारीत संच मान्यता मंजूर करून घेण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत. सध्याच्या संच मान्यता अंतिरिम असल्या तरी आधार व्हॅलिड करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल आहे. जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांचे ८, ३५, १९७ विद्यार्थी आहेत. त्यामध्ये आधार असलेले ८, २८, ४६२ तर आधार व्हॅलिड नसलेले १,५९,२१२ विद्यार्थी आहेत. आधार नसलेल्यांची संख्या ६७३५ आहे. आधार व्हॅलिडेशनच्या कामात जळगाव, अमळनेर, बोदवड, चाळीसगाव, पारोळा तालुके सर्वात मागे आहेत. त्यांचे काम ७० टक्क्यांपेक्षा कमी आहे. ७० टक्क्यांपेक्षा जास्त काम असलेल्या तालुक्यांमध्ये भुसावळ, भडगाव, चोपडा, एरंडोल, जळगाव मनपा, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, रावेर, यावल यांचा समावेश आहे.
प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत ३० एप्रिलपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे अनेक विद्यार्थी भेटत नाही, पालक स्थलांतरित मजूर आहेत. आधारमध्ये नाव, जन्मतारखेच्या त्रुटी आहेत तरीही पालक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने मुख्याध्यापक वैतागले आहेत. त्यामुळे काही शाळांनी स्वखर्चाने आधारचे कॅम्प विद्यार्थ्यांसाठी लावले आहेत. पारोळा येथील एका शाळेने ४१ विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड करून घेण्यासाठी आठ हजार रुपये खर्च केले आहेत. हीच स्थिती अन्य शाळांची झाली आहे.