जळगाव : शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. आता तर काही ठिकाणी चारी खोदून ठेवण्यात आल्या आहेत. या चारीमुळे शहरातील प्रकाश पाटील यांचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. अपघातानंतर मनपा प्रशासनाला जाग आली असून उपमहापौरांच्या सूचनेनंतर ठेकेदाराने ती चारी बुजविल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अमृत योजनेचे काम सुरू आहे़ त्यामुळे जागोजागी खड्डे खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर थातूर-मातूर खड्डे बुजविले जात आहेत. आता तर रस्त्यांच्या मधोमध चारी करण्यात आली आहे. त्यामुळे अपघात होत आहे. एसटी वर्कशॉप ते का.ऊ.कोल्हे शाळेजवळही चारी खोदून ठेवण्यात आली होती. त्या परिसरातील काळे पेट्रोल पंपाजवळून जाताना शहरातील रहिवासी प्रकाश पाटील यांचा चारीमुळे अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली. ही बाब माजी नगरसेविका ममता कोल्हे यांचे पती संजय कोल्हे यांनी समोर आणल्यानंतर उपमहापौरांनी लागलीच ठेकेदारास चारीची दुरुस्ती करण्याची सूचना केली. त्यानुसार चारीची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्या भागातील पथदिवे बंद असल्यामुळे त्यांचीही दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.