धरणगाव : तालुक्यातील वराड बुद्रूक येथे ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी २५ दिवसांनंतर पाणी पुरवठा होत आहे. त्यातच २५ दिवसांनंतरही अल्प पाणी सोडल्यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी महिला सरपंच मंगलाबाई अभिमन पाटील यांना व त्यांचा पती, मुलगा यांना १३ रोजी रात्री मारहाण केली. यानंतर सरपंच यांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.वराड बुद्रूक येथे पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांना एक-दोन किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. दरम्यान, भारत निर्माण योजनेंतर्गत ५० लाख रुपये खर्च करुन गावाला २० ते २५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच सरपंचांनी आपल्या मर्जीतील लोकांना अवैध नळ कनेक्शन दिल्याचा आरोप आहे. हा सरपंचावरील रोष नागरिकांनी काढला.१३ रोजी रात्री ग्रा.पं.ने पाणी सोडल्यानंतर सरपंच मगला पाटील, पती अभिमन पाटील, मुलगा पंकज हे गावात येवून पाणी बचतीचा सल्ला देत होते. एक तर २० ते २५ दिवसांनंतर पाणी सोडले व वरुन शहाणपण शिकवत आहात का? असा संताप लोकांनी व्यक्त करुन सरपंच, त्यांचा पती, मुलगा यांना बदडले. तेव्हा त्यांनी पाळधी औट पोस्टला धाव घेऊन हकिकत सांगितली. पोलिसांनी त्यांना पहिल्यांदा उपचार घ्या म्हणत मेमो दिल्याने ते जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत. या घटनेसंदर्भात सरपंच मंगलाबाई अभिमन पाटील यांनी तक्रार दिल्यावरून गावातील महारू भिल यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
संतप्त जनतेची महिला सरपंचाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 4:13 PM